पाच पिढ्यांपासून पारंपरिक ‘देव राखी’ बनवणारे बाळापूरचे मुस्लिम कुटुंब

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 52 m ago
देव राखी बनवणारे अकोल्यातील बाळापूरचे ताज मोहम्मद आणि आणि त्यांची आई
देव राखी बनवणारे अकोल्यातील बाळापूरचे ताज मोहम्मद आणि आणि त्यांची आई

 

भक्ती चाळक

समाजाला प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवण्याचे काम बाळापूरचे ताज मोहम्मद अन् त्यांचे कुटुंब गेल्या पाच पिढ्यांपासून निष्ठेने करत आहे. रक्षाबंधनला महाराष्ट्रातील घराघरांत देवासमोर जी पहिली राखी अर्पण केली ती ‘देव राखी’ हेच कुटुंब तयार करते. 

अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये राहणारे ताज मोहम्मद यांचे कुटुंब पिढ्यान्‌पिढ्या राखी बनवण्याचा व्यवसाय करत आले आहे. ताज मोहम्मद यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले. आजोबांच्या निधनानंतर जन्माला आलेल्या नातवाने पूर्वजांची ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पुढे चालवली आहे.

‘आवाज द व्हॉईस’ला ताज मोहम्मद सांगतात, “आमची ही पाचवी पिढी राखी बनवतेय. रक्षाबंधनाला लागणारी ‘देव राखी’ आमच्याकडे तयार होते. पूर्वजांच्या काळापासून हा कारभार सुरू आहे. फक्त राखीच नाही, तर दिवाळीच्या सणाला लागणारे करदोडे, दुर्गाोत्सवासाठी ओटीचे सामान आणि लुगडे, अशा प्रत्येक हिंदू सणानुसार आम्ही माल तयार करतो अन् बाजारात विकतो.”

आज बाजारात प्लास्टिक आणि चायनीज राख्यांचा सुळसुळाट दिसतो. बाळापूरच्या या कुटुंबाची पिढ्यानपिढ्यांची खासियत वेगळीच आहे. ते खास ‘देव राखी’ बनवतात. कोणत्याही धार्मिक पूजेची सुरुवात देवाला ही राखी बांधल्याशिवाय पूर्ण होत नाही. पुठ्ठ्यावर किंवा रेडीमेड धाग्यांवर बनणाऱ्या आधुनिक राख्यांपेक्षा या पारंपारिक देव राखीचे स्थान लोकांच्या मनात अनन्यसाधारण आहे.

कौटुंबिक व्यवसाय
राखी तयार करायला सोपी वाटत असली तरीही त्यामागे अफाट मेहनत असते. एका साध्या पांढऱ्या धाग्यापासून देव राखीची निर्मिती सुरू होते. बाजारातून मिळणारा कच्चा माल हा फक्त पांढऱ्या सुताच्या स्वरूपात असतो. ते घरी आणल्यानंतर राखी बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू होते.

पांढरे सूत आणायचे, त्याला हवे ते रंग द्यायचे, रंग पक्का करण्यासाठी ते उकळवायचे, वाळवायचे आणि मग त्यापासून विविध रंगांचे सुंदर धागे विणायचे. लाल, पिवळा आणि इतर पारंपरिक रंगांची सांगड घालून ही देव राखी साकारली जाते. रक्षाबंधनाचे दिवस जवळ आले की, दोन महिने आधीपासूनच संपूर्ण कुटुंब या कामात रात्रीचा दिवस करते.

हा व्यवसाय ताज मोहम्मद यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नाहीये. सणाच्या काळात परिसरातील शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही यातून चार पैसे मिळतात. एकच कुटुंब एवढा मोठा माल एकटे तयार करू शकत नाही. म्हणूनच ते अकोल्यातील शेजारच्या कुटुंबांना हे काम वाटून देतात. मग काम देताना ते हिंदू आहेत की मुस्लीम हे अजिबात पाहिले जात नाही. 

ताज मोहम्मद सांगतात, “जे नेहमीचे जुने कारागीर आहेत, त्यांना ८० रुपये आणि नव्या लोकांना ६० रुपये भावाने देऊन माल तयार करून घेतो. यामुळे सणाच्या दिवसांत शेजाऱ्यांनाही दोन पैशांचा फायदा होतो. आमचा व्यवसाय म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा कारभार आहे.”
 

नफ्यापेक्षा भावनेला प्राधान्य
आजच्या काळात लोक व्यापारी नफ्यासाठी धडपडत असताना, ताज मोहम्मद यांचे कुटुंब मात्र वारसा पुढे चालवत आहे. लाखोंची उलाढाल किंवा कोट्यवधींचा नफा कमावणे हा या कामामागचा उद्देश कधीच नव्हता. हजारो रुपयांचा कच्चा माल आणून, त्यापासून कष्ट उपसून देव राखी बनवली जाते.

ताज मोहम्मद म्हणतात, “जास्त पैशांची लालच त्या लोकांना असते ज्यांच्या गरजा मोठ्या असतात. आमचे तसे नाही. आमची रोजंदारी निघाली, आमचे काम चालले आणि आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या शेजाऱ्यांचाही चार पैशांचा फायदा झाला की आम्ही समाधानी असतो. १० रुपयांच्या वस्तूवर ५० रुपये कमवायचे, ही आमची विचारसरणी नाही. हा पूर्वजांचा व्यवसाय आहे, लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, हीच भावना मनात ठेवून आम्ही हे काम करतो.”

रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बाळापूरच्या या कारखान्यातून सगळा माल तयार होऊन अकोल्याच्या मुख्य बाजारात पोहोचवला जातो. गेल्या अनेक दशकांपासून या कुटुंबाकडून राखी खरेदी करणारे अकोल्यातील व्यापारी ताज यांच्याकडून आजही विश्वासाने खरेदी करतात.

पिढ्यानपिढ्यांचा विश्वास 
गुजराती, मारवाडी आणि सिंधी समाजातील व्यापारी गेल्या अनेक पिढ्यांपासून ताज मोहम्मद यांच्याकडूनच देव राखी खरेदी करत आले आहेत. जुन्या व्यापाऱ्यांनी आपल्या नव्या पिढीला सांगून ठेवले आहे की, “बाळापूरच्या या कुटुंबाकडूनच माल घ्यायचा, कारण त्यांचा माल दर्जेदार असतो आणि त्यांच्याशी आमचे पिढ्यांचे संबंध आहेत.”

ताज मोहम्मद भावूक होऊन म्हणतात, “आमच्या पूर्वजांनी आम्हाला कधीच असे सांगितले नाही की, हे काम दुसऱ्या धर्माचे आहे किंवा हे हिंदूंचे काम आहे, तुम्ही करू नका. आमच्यासाठी ही रोजीरोटी आहे. लोकांच्या श्रद्धेशी जोडलेले काम करताना आम्हाला खूप आनंद मिळतो.”

ते पुढे म्हणतात, “आजकाल देशात जे नफरतीचे वातावरण पसरवले जातेय, त्या काळात आमची ही कहाणी हिंदू-मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचली तर मला सर्वात जास्त आनंद होईल. हे पाहून लोकांचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.”

ताज पुढे आवर्जून सांगतात, “आमच्या कामामुळे लोक खूश व्हावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा असते. आमच्या पूर्वजांपासून चालत आलेल्या परंपरेचा लोकांना आदर वाटावा. समाजाला मी एवढंच सांगेन की, कोणतेही काम एका विशिष्ट धर्माचे नसते. कोणतेही काम कोणाला खाली दाखवण्यासाठी नसते, हाताला मिळेल ते काम आपण करावे.”

रक्षाबंधनाचा सण हा बहिणभावाच्या प्रेमाचा सण आहेच, शिवाय तो संपूर्ण समाजाला एका धाग्यात बांधणारा सण आहे. आपला धर्म वेगळा असला तरी लोकांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा आदर करत व्यवसाय कसा करावा याचा वस्तुपाठ या कुटुंबाने घालून दिलाय. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter