NEPAL FLOODS: महाराष्ट्रातील ७ पर्यटक पुरात अडकले; ४ जण सुखरूप, ३ जणांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
नेपाळमधील महाप्रलयात महाराष्ट्रातील नागरिक अडकल्याने खळबळ; मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू
नेपाळमधील महाप्रलयात महाराष्ट्रातील नागरिक अडकल्याने खळबळ; मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू

 

मुंबई 

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील सात पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी चार पर्यटक सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले असून, उर्वरित तीन पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री दिली.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी दोन अशा चार पर्यटकांशी संपर्क साधला असून ते सर्वजण आपल्या हॉटेल्समध्ये सुरक्षित आहेत. मात्र, इतर तीन पर्यटकांची सविस्तर माहिती अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. नेपाळमधील पूरपरिस्थितीत महाराष्ट्रातील अन्य कोणी नागरिक अडकले आहेत का, याची खात्री करण्यासाठी प्रशासन एक यादी तयार करत असून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून हेल्पलाईन नंबर जारी

नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) विशेष हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक १०७० किंवा +९१-९३२१५८७१४३ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच [email protected] या ईमेलवरही संपर्क साधता येणार आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या माहितीसाठी विशेष ऑनलाईन लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, तिबेटमधून आलेल्या महापुरात मध्य नेपाळमधील अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून भारताच्या १३३ नागरिकांसह शेकडो लोक बेपत्ता आहेत.