भारतीय महिला हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एफआयएच (FIH) जागतिक चषक हॉकी स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील वरच्या स्थानावरील जर्मनीचा ३-१ असा पराभव केला. या विजयासह भारताने या स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले आहे. महिला हॉकी वर्ल्ड कपच्या ५२ वर्षांच्या इतिहासातील भारतीय संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
सामन्यातील ४४ व्या आणि ४७ व्या मिनिटाला नवनीत कौरने दोन शानदार गोल करत भारताच्या या ऐतिहासिक विजयात मुख्य भूमिका बजावली. त्याआधी ४३ व्या मिनिटाला इशिकाने भारतासाठी पहिला गोल नोंदवला. जर्मनीकडून लिन क्रिंग्सने ५९ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. १९७४ मधील पहिल्या महिला वर्ल्ड कपमध्ये अजिंदर कौर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चौथे स्थान पटकावले होते, त्यानंतरची ही संघाची सर्वात उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. विशेष म्हणजे सध्याच्या भारतीय संघात तब्बल ११ खेळाडूंनी पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळला आहे.
शेवटच्या १७ मिनिटांत भारतीय संघाचा तुफान खेळ
संपूर्ण स्पर्धेत ९ व्या क्रमांकावरील भारतीय संघाला केवळ एकाच पराभवाचा सामना करावा लागला. ऑलिम्पिक विजेत्या नीदरलँड्सने भारताचा २-० असा पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने भारताचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले होते. मात्र classification सामन्यात भारतीय खेळाडूंनी पूर्ण ताकदीने खेळत शेवटच्या १७ मिनिटांत तब्बल ३ गोल डागले.
सामन्याच्या पहिल्या ४३ मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. जर्मनीला ६ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारताची गोलकीपर बिचू देवी आणि बचाव फळीने अत्यंत भक्कम कामगिरी करत त्यांचे सर्व प्रयत्न उधळून लावले. ४३ व्या मिनिटाला इशिकाने रिव्हर्स हिट मारत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. त्यानंतर नवनीत कौरने सलग दोन गोल करत भारताची आघाडी ३-० अशी मजबूत केली. या विजयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय महिला हॉकी संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढणार आहे.