भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का; कर्णधारपद सोडत असल्याचे हरमनप्रीत कौरने केले जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 37 m ago
क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर
क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर

 

नवी दिल्ली 

भारताची एकमेव विश्वचषक विजेती महिला क्रिकेट कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मंगळवारी आपल्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटच्या नेतृत्वातून बाजूला होत असल्याचे तिने जाहीर केले असून, आता केवळ एक खेळाडू म्हणून देशासाठी खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गुवाहाटीतील आढावा बैठकीनंतर निर्णय

गुवाहाटी येथे झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर ३७ वर्षीय हरमनप्रीतने सोशल मीडियावरून ही घोषणा केली. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला हरमनप्रीतसह उपकर्णधार स्मृती मंधाना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांतील संघाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. स्मृती मंधाना हिचे नाव पुढील कर्णधारपदासाठी आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

संघासाठी सर्वस्व दिले: हरमनप्रीत

आपल्या भावनिक संदेशात हरमनप्रीतने म्हटले की, "मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. या संघात मी माझे सर्वस्व दिले आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मी अभिमानाने पेलली, मात्र आता खेळाच्या प्रेमासाठी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहे." २०१६ मध्ये टी-२० संघाचे नेतृत्व हाती घेतलेल्या हरमनप्रीतने २०२२ मध्ये एकदिवसीय आणि २०२३ मध्ये सर्व फॉरमॅटचे नेतृत्व सांभाळले होते. तिच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी ऐतिहासिक एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.



Latest News