मणिपूरमध्ये तणाव कायम; विविध जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
मणिपूरमधील प्रातिनिधिक इमेज
मणिपूरमधील प्रातिनिधिक इमेज

 

इम्फाल 

मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्याप तणावपूर्ण असून, दोन समुदायांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करत प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.

शुक्रवार आणि शनिवार दरम्यान कामजोंग, उखरुल आणि कांगपोकपी जिल्ह्यांमध्ये नवीन हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री खेमचंद सिंह यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये निर्दोष नागरिकांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी तसेच सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांना तातडीने आणि प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा वाढवली आणि मृतांची माहिती

परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वाधिक प्रभावित कांगपोकपी आणि कामजोंग जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत. कामजोंग जिल्ह्यातील कुकी-बहुसंख्य चासाद गावात ५ मुलांची आई असलेल्या २२ वर्षीय महिला अज्ञात हल्लेखोपांच्या गोळीबारात मृत पावल्याने या ताज्या हिंसाचाराची सुरुवात झाली होती. त्यानंतर कुकी आणि नागा सशस्त्र गटांमध्ये तुफान गोळीबार झाला, ज्यामध्ये ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि १० घरे जाळण्यात आली.

या घटनेनंतर नागा-बहुसंख्य कांगपोकपी जिल्ह्यातील तापोन आणि माकुई गावांवर संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये दोन नागा ग्रामरक्षक आणि अन्य एक व्यक्ती मारले गेले. तसेच कामजोंग आणि उखरुल जिल्ह्यांतही विविध गोळीबाराच्या घटनांमध्ये नागरिक व वाहनचालक बळी पडले. यावर्षी फेब्रुवारीपासून कुकी आणि नागा आदिवासींमधील संघर्षात आतापर्यंत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.