मुंबई
भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत गौरवोद्गार काढले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासारखा दुसरा अभिनेता कधीही होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया इम्तियाज अली यांनी दिली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना ५५ वर्षीय दिग्दर्शक इम्तियाज अली म्हणाले की, मी स्वतःला अशा पिढीतील मानतो जिचा जन्म भारतात अमिताभ बच्चन यांच्या युगात झाला आहे. या महान अभिनेत्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे सुरुवातीला त्यांच्यासोबत काम करण्याचे धाडस होईल की नाही, अशी शंका मला वाटत होती. मात्र, एका जाहिरातीच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काम केल्यावर माझा तो गैरसमज दूर झाला, असे त्यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत भविष्यात एखाद्या चित्रपटात नक्कीच काम करायला आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलच्या 'सेलिब्रेट सिनेमा '२६' या वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सत्रात ते बोलत होते.
'जब वी मेट', 'रॉकस्टार', 'तमाशा' आणि 'लव्ह आज कल' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इम्तियाज अलींसाठी हे वर्ष अनेक अर्थांनी खास ठरले आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, तर अलीकडेच त्यांच्या 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि आदरामुळे आपल्या जबाबदारीची जाणीव अधिक वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.