हिना खानने दिली काश्मीरच्या शाळेला भेट; भारतीय सैन्याचे कौतुक करत काय म्हणाली अभिनेत्री?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
उरी येथील आर्मी गुडविल स्कूलमधील विद्यार्थ्यांसमवेत अभिनेत्री हिना खान
उरी येथील आर्मी गुडविल स्कूलमधील विद्यार्थ्यांसमवेत अभिनेत्री हिना खान

 

टीव्ही जगतातील लाडकी अभिनेत्री हिना खानने थेट भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या उरी क्षेत्रातील बोनियार येथील एका शाळेला भेट दिली. प्रसिद्ध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या हिनाने आर्मी गुडविल स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. सीमावर्ती भागातील या मुलांचा दांडगा आत्मविश्वास अन् त्यांची स्वप्नं पाहून हिना खान थक्क झाली.

शाळेला भेट दिल्यानंतर श्रीनगरची कन्या असलेल्या ३८ वर्षीय हिना खानने पत्रकारांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "इथे येऊन मुलांना भेटणे आणि त्यांच्याशी गप्पा मारणे हा एक अद्भूत अनुभव होता. इथं आल्यामुळे या शाळेविषयी अन् इथल्या सोयी-सुविधांविषयी मला नवीन गोष्टी जाणून घेता आल्या."

ती पुढे म्हणाली, "इथली मुलं प्रचंड हुशार आणि आत्मविश्वासू आहेत. या शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी 'NEET' परीक्षा पास केली आहे, हे ऐकून मला खूप आनंद झाला."

सीमावर्ती भागात राहणाऱ्या या चिमुकल्यांच्या मनात आपल्या भविष्याबद्दल स्पष्टता असल्याचं पाहून हिनाला खूप नवल वाटलं. ती पुढे म्हणाली, "आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, याबद्दल मुलांच्या मनात एकदम स्पष्ट चित्र आहे. कोणाला इंजिनिअर व्हायचं आहे, तर कोणाला डॉक्टर बनायचं आहे. प्रत्येकाला आपलं ध्येय ठाऊक आहे. मुलांचा हा आत्मविश्वास अन् शाळेत त्यांना मिळणारी वागणूक खरोखर कौतुकास्पद आहे."
 

भारतीय सैन्याचे मनापासून आभार
दुर्गम भागात शाळांची एवढी उत्तम व्यवस्था उभारल्याबद्दल हिनाने भारतीय लष्कराचे मनापासून कौतुक केले. ती म्हणाली, "इथं सर्व गोष्टींवर सवलत दिली जाते. इतक्या लांबच्या अन् दुर्गम भागात सैन्याने एवढ्या शाळा उभारल्या, याचं श्रेय पूर्णपणे आपल्या सैन्याला जातं. मी तर लष्कराच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की मुख्य शहरांमध्येही अशा शाळा सुरू करा. जेणेकरून तिथल्या मुलांनाही असे दर्जेदार शिक्षण अन् उत्तम शिक्षक मिळतील."

विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना हिनाने त्यांना स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याविषयी सांगितलं. ती म्हणाली, "आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची ही जिद्द आपण नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. हा मार्ग थोडा कठीण अन् आव्हानात्मक असतो, हे मला ठाऊक आहे. आम्हीही या टप्प्यातून गेलो आहोत. सर्वच तरुण या संघर्षातून जातात. परंतु, या अडचणी पार केल्यानंतर जेव्हा यशाचं फळ हाताला लागतं, तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो."
 

काश्मिरी कन्येच्या आगमनाने परिसर फुलला
आपल्या लाडक्या अभिनेत्रीला प्रत्यक्ष समोर पाहून शाळेतील विद्यार्थी अन् शिक्षक भारावून गेले. हिनाच्या या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह भरला. दहावीतील विद्यार्थिनी रिवा म्हणाली, "आपच्या शाळेत हिना खानसारख्या प्रसिद्ध कलाकाराला प्रत्यक्ष पाहून फार भारी वाटलं. त्यांच्या येण्याने आमच्या शाळेचा उत्साह एकदम वाढला."

तर उमरा अली या दुसऱ्या विद्यार्थिनीने भावना व्यक्त करताना सांगितलं, "हिना खान आमच्या शाळेत आल्या, हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. त्यांच्या आगमनाने संपूर्ण कॅम्पसमध्ये ऊर्जा पसरली. आपणसुद्धा आयुष्यात खूप मोठी उंची गाठू शकतो, असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला. हिना खान स्वतः काश्मिरी आहेत, त्यामुळे आपल्याच भागातील एका व्यक्तीला यशाच्या शिखरावर पोहोचताना पाहणे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे."

काश्मिरी लग्नातील तुंबकनारीचा ताल
या भेटीव्यतिरिक्त हिनाने श्रीनगरमधील एका लग्नकार्यातील कौटुंबिक क्षणही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या बहिणीच्या सासरच्या मंडळींसोबत पारंपारिक तुंबकनारी वाद्य वाजवतानाचे व्हिडीओ तिने पोस्ट केले.

"एक मोठी बहीण म्हणून लहान बहिणीच्या सासरी आपला दरारा राहिला पाहिजे!" अशा मजेशीर शैलीत तिने या काश्मिरी सोहळ्याची झलक दाखवून आपल्या काश्मीर दौऱ्यातील क्षण चाह्त्यांसोबत शेअर केले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter