National Sports Day 2026: पंतप्रधान मोदींचे ॲथलीट्सना महत्त्वाचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण खेळांपैकी अर्ध्या स्पर्धांमध्ये भारताचा सहभागच नसतो, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी तीव्र खंत व्यक्त केली. सर्फिंग आणि स्पोर्ट क्लायंबिंगसारख्या आतापर्यंत भारताचे प्रतिनिधित्व न झालेल्या नवीन खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी उतरल्याशिवाय ऑलिम्पिकमधील भारताची पदकांची संख्या वाढू शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमात देशाभरातील शेकडो खेळाडू, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांशी आभासी प्रणालीद्वारे संवाद साधताना त्यांनी हा क्रीडा रोडमॅप स्पष्ट केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक प्रकारचे खेळ समाविष्ट असतात, परंतु दुर्दैवाने भारतीय संघ त्यातील निम्म्या खेळांमध्येही सहभागी होत नाहीत. याचा अर्थ आपण पदकांच्या एका मोठ्या दाव्यापासून आधीच दूर राहतो. हे एक कडू सत्य असून गेल्या अनेक दशकांपासून हीच परिस्थिती आहे. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने केवळ १३ खेळांमध्ये भाग घेतला होता, तर २० हून अधिक खेळांमध्ये आपले प्रतिनिधित्वच नव्हते. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने ३२ पैकी १६ खेळांमध्ये सहभाग घेतला होता, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

नव्या खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज
२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या सर्फिंग आणि स्पोर्ट क्लायंबिंगचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, भारताला विशाल समुद्रकिनारा आणि मोठा पर्वतीय प्रदेश लाभला आहे. त्यामुळे आपल्याकडे वॉटर स्पोर्ट्स आणि विंटर स्पोर्ट्ससाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती उपलब्ध आहे. तरीही आपण या खेळांमध्ये जागतिक पातळीवर दिसत नाही. त्यामुळेच देशातील विविध भागांत अशा खेळांची निर्मिती करून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे लागेल, तरच पदकांची संख्या वाढू शकेल.

खेळांमुळे तरुणांचे चरित्र निर्माण आणि अंमली पदार्थांपासून बचाव
क्रीडा क्षेत्राचा विकास म्हणजे केवळ पदके जिंकणे नसून विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवा शक्ती आणि क्रीडा शक्ती एकत्र आणणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. "स्क्रीनपेक्षा स्पोर्ट्स सेंटर्स महत्त्वाचे आहेत आणि प्ले-स्टेशनपेक्षा प्ले-ग्राऊंड्स महत्त्वाचे आहेत," असे मार्मिक विधान त्यांनी केले.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. याशिवाय जम्मू-काश्मीरची आर्चर शीतल देवी, पॅरा-शूटर अवनी लेखरा आणि पॅरा-जॅव्हलिन थ्रोअर सुमित अंतील यांसारख्या पॅरा-ॲथलीट्सच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करत, त्यांचे आयुष्य सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.