नेपाळ महापुरात अडकल्या १०० हून अधिक भारतीय पर्यटकांच्या शोधासाठी मदतकार्य सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
नेपाळ-तिबेट सीमेवरील महापुराचे दृश्य
नेपाळ-तिबेट सीमेवरील महापुराचे दृश्य

 

तिबेटमध्ये लागोपाठ झालेल्या भूकंप आणि हिमनदीच्या स्फोटामुळे मध्य नेपाळमध्ये बुधवारी अचानक भीषण महापूर आला. या जलप्रलयामुळे अनेक गावे आणि शहरे पाण्याखाली गेली असून आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३३ भारतीय नागरिकांसह ७५० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे महामार्गांवरील प्रमुख पूल वाहून गेले असून सुमारे डझनभर जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर कनाल यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, तिबेट क्षेत्रात स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:३७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि अवघ्या तीन मिनिटांत महापुराची आपत्ती ओढवली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे हिमनदी फुटून (Glacial Outburst) हा भीषण पूर आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तिबेट सीमेलगतच्या रसुवा आणि धाडिंग जिल्ह्यांतून वाहणाऱ्या भोटे कोशी नदीला याचा सर्वात मोठा फटका बसला असून, हे पाणी त्रिशुली नदीत शिरल्याने काठमांडूपासून ७० ते २०० किलोमीटर अंतरावरील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला आहे.

पंतप्रधान मोदींकडून मदत आणि हेल्पलाइन जाहीर
नेपाळमधील या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या कठीण प्रसंगात भारताकडून सर्व शक्य ती मानवतावादी मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भारताने तातडीने मदत साहित्याची पहिली खेप नेपाळकडे रवाना केली आहे. याशिवाय काठमांडू येथील भारतीय दूतावासाने अडकलेल्या भारतीयांच्या माहितीसाठी +977 985 131 6807 आणि +977 970 910 7500 हे आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

कैलास मानसरोवर यात्रेकरू आणि नागरिक बेपत्ता
बेपत्ता असलेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या ५० हून अधिक भाविकांचा समावेश आहे. याशिवाय 'ईशा फाऊंडेशन'चे ७७ सदस्य एका इमिग्रेशन केंद्रावर असताना पुराच्या विळख्यात सापडल्याने बेपत्ता झाले आहेत. भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियासह सुमारे २४ हून अधिक देशांतील नागरिक या आपत्तीत बाधित झाले आहेत. पुराच्या तीव्र प्रवाहामुळे ४२ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे नष्ट झाला असून तब्बल १९ मोठे पूल वाहून गेले आहेत.

नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक यंत्रणांनी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. लष्कराची १२ हेलिकॉप्टर्स आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके बाधित भागात दाखल झाली असून पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.