गौस सिवाणी
अल्लामा इक्बाल यांच्यासारख्या कट्टर इस्लामिक विचारवंताला हिंदू तत्त्वज्ञानात एवढा रस का असावा? आपल्या पुस्तकांमध्ये, भाषणांमध्ये त्यांनी हिंदू विचारवंतांचा उल्लेख वारंवार का केला? वेदांताचे गूढ तत्त्वज्ञान त्यांना का भुरळ घालत होते? हिंदू संतांची स्तुती करताना त्यांनी कधीही संकोच का बाळगला नाही? अगदी ते गोमांस खाणेही टाळायचे, असे म्हटले जाते. अल्लामा इक्बाल यांच्या विचारांचा सखोल मागोवा घेताना अशा अनेक प्रश्नांचा गुंता मनात निर्माण होतो.
इक्बाल यांच्याभोवती वादांचे वलय कायम राहिले. पाकिस्तानच्या निर्मितीची पहिली ठिणगी त्यांनीच टाकली का, यावर आजही मतमतांतरे आहेत. एक मात्र नक्की, भारतीय उपखंडातील ते एक अत्यंत उत्तुंग विचारवंत, कवी अन् दार्शनिक होते. पूर्व आणि पश्चिमेकडील परस्परविरोधी विचारसरणींचा त्यांनी सखोल अभ्यास केला, त्यांच्याशी विधायक संवाद साधला.
ते एक इस्लामिक विचारवंत होते, यात शंकाच नाही; पण भारताच्या प्राचीन धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक परंपरांचा, विशेषतः वेदांत तत्त्वज्ञानाचा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. केवळ हिंदू धर्मच नाही, तर इतरही अनेक धर्मांची शिकवण आणि त्यातील महान व्यक्तिमत्त्वांना समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धर्म म्हणजे द्वेष, भेदभाव किंवा भिंती उभारण्याचे साधन नसून ती मानवता, नैतिकता आणि आत्मिक विकासाची वाट आहे, अशी त्यांची ठाम धारणा होती.
इक्बाल यांचे मूळ कुटुंब कश्मीरी ब्राह्मण होते. आपल्या या कौटुंबिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल त्यांच्या मनात आदर होता. त्यांना संस्कृत भाषेची जाण होती अन् वेदांत तत्त्वज्ञानाचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता.
इक्बाल यांचे कुटुंब आणि भारतीय संस्कृतीशी नातं
अल्लामा इक्बाल यांचे पूर्वज काश्मीरमधील एका ब्राह्मण कुटुंबातील होते. सतराव्या शतकात त्यांच्या कुटुंबाने इस्लामचा स्वीकार केला. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीची इक्बाल यांना पूर्ण जाणीव होती.
अनेक जणांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण इक्बाल अजिबात गोमांस खात नसत. त्यांच्या सियालकोट या शहरात बीफ खाणे ही अतिशय सामान्य बाब होती, तरीही ते त्यापासून दूर राहायचे. हे त्यांच्या ब्राह्मण कुळातील संस्कारांमुळे होते की आणखी काही कारण होते, हे ठामपणे सांगता येत नाही. त्यांच्या चरित्रकारांनी मात्र ते बीफ खाणे टाळायचे, या नोंदी स्पष्टपणे लिहून ठेवल्या आहेत.
इक्बाल यांचा ज्योतिषावर विश्वास नव्हता. तरीही त्यांनी आपला मुलगा जावेद इक्बाल याची जन्मपत्रिका बनवून घेतली होती, असाही एक रंजक उल्लेख आढळतो.
ब्राह्मण पार्श्वभूमीचा अभिमान
काश्मीरमध्ये मध्ययुगीन काळात मुस्लिम सत्ता आल्यानंतर ज्या कश्मीरी पंडितांनी सर्वात आधी फार्सी भाषा शिकून सरकारी सेवेत प्रवेश केला, त्या समुदायातून इक्बाल येत होते. या समुदायाला पुढे 'सप्रू' म्हटले जाऊ लागले आणि कालांतराने हेच एका गोत्राचे नाव बनले.
इक्बाल यांचे सुपुत्र जस्टिस जावेद इक्बाल यांनी आपल्या 'जिंदा रूद' या पुस्तकात लिहिले आहे: "एका नोंदणीकृत दस्तऐवजात इक्बाल यांनी आपली जातीय ओळख 'सप्रू (कश्मीरी पंडित)' अशी लिहिली होती. आपले कुटुंब कश्मीरी ब्राह्मणांच्या एका प्राचीन वंशातील आहे, हे त्यांनी स्वतःच्या वडिलांकडून ऐकले होते. त्यांचे गोत्र 'सप्रू' होते. त्यांचे एक पूर्वज बाबा लोल हज यांनी इस्लाम स्वीकारला, पुढे ते 'लूली हाजी' नावाने प्रसिद्ध झाले."
इक्बाल यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक जगन्नाथ आझाद यांनीही लिहून ठेवले आहे की, इक्बाल यांचा संबंध कश्मीरी पंडितांच्या अशा कुटुंबाशी होता, ज्याची एक शाखा आजही काश्मीरमध्ये आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी एका सुफी संताच्या प्रभावातून इस्लाम स्वीकारला. त्या संताबद्दलची श्रद्धा या कुटुंबात अनेक पिढ्या टिकून होती.
(संदर्भ: इक्बाल आणि काश्मीर - जगन्नाथ आझाद, पान ३२)
इक्बाल यांचे कुटुंब मूळचे कश्मीरी ब्राह्मण होते, यात शंका उरत नाही. धर्म बदलला, तरी त्यांचा सांस्कृतिक आणि कौटुंबिक इतिहास तोच राहिला. त्यांनी आपली ओळख किंवा ज्ञानाच्या कक्षा कधीच संकुचित विचारांमध्ये बांधून ठेवल्या नाहीत.
१६ जानेवारी १९३४ रोजी मुहम्मद दीन फौक यांना लिहिलेल्या पत्रात इक्बाल यांनी 'सप्रू' शब्दाच्या उत्पत्तीविषयी आपले विचार मांडले होते. ते लिहितात:
"प्रिय फौक !
मला ठाऊक नाही की कश्मीरी भाषेत 'सप्रू' शब्दाचा नेमका अर्थ काय होतो. कदाचित तुम्ही लिहिल्याप्रमाणे लहान वयातच मोठ्यांसारखी बुद्धिमत्ता दाखवणारा मुलगा, असा त्याचा अर्थ असावा. कश्मीरी ब्राह्मणांच्या 'सप्रू' गोत्राबद्दल मी माझ्या दिवंगत वडिलांकडून जे ऐकले होते, ते सांगतो.
काश्मीरमध्ये मुस्लिमांची सत्ता स्थापन झाली, तेव्हा बहुतेक ब्राह्मण जुन्या परंपरांमुळे किंवा इतर कारणांमुळे मुस्लिमांची भाषा अन् विद्या शिकण्याकडे लक्ष देत नसत. ज्या गटाने सर्वात आधी फार्सी भाषा शिकली, त्यात प्राविण्य मिळवले आणि मुस्लिम शासकांचा विश्वास जिंकला, तो गट 'सप्रू' म्हणून ओळखला गेला. 'स' म्हणजे सर्वात आधी शिकायला सुरुवात करणारा. 'प्रू'चे मूळ 'पढ़ना' (वाचणे/शिकणे) या शब्दात आहे.
माझे स्वर्गीय वडील सांगायचे की, आपल्या जुन्या सामाजिक आणि धार्मिक परंपरा सोडून इस्लामी भाषा व शिक्षण घेणाऱ्या भावांना काश्मिरी ब्राह्मणांनी उपहासाने हे नाव दिले होते. हळूहळू हेच नाव कायमस्वरूपी गोत्र बनले.
पंजाबचे कमिशनर दिवाण टेकचंद एम.ए. यांना भाषाशास्त्राच्या अभ्यासाची आवड होती. एकदा अंबाला येथे त्यांनी मला सांगितले की, 'सप्रू' या शब्दाचा संबंध प्राचीन इराणी राजा शाहपूर याच्याशी आहे. त्यांच्या मते 'सप्रू' मूळचे इराणी होते, जे इस्लाम येण्यापूर्वीच इराण सोडून काश्मीरमध्ये स्थायिक झाले आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर ब्राह्मणांमध्ये मिसळून गेले.
अल्लासच ठाऊक खरं काय ते!
मला माहीत आहे त्यानुसार, पंजाबात सप्रू कुटुंबातील एकही मुस्लिम घर नाही. एजाजच्या लग्नाच्या वेळी आम्ही खूप शोध घेतला, पण यश आले नाही.
मुहम्मद इक्बाल
१६ जानेवारी १९३४"
(संदर्भ: अनवार-ए-इक्बाल, बशीर अहमद दार, पृष्ठ ७६-७७, इक्बाल अकादमी, लाहौर)
या पत्रात इक्बाल यांनी 'सप्रू' शब्दाच्या उत्पत्तीबाबत दोन भिन्न मते मांडली आहेत. पहिले मत त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावर आधारित आहे, तर दुसरे मत दिवाण टेकचंद यांचे आहे. दोन्ही मते लिहिल्यानंतर शेवटी "अल्लासच ठाऊक खरं काय ते!" (वल्लाहु आलम) असे म्हणणे, त्यांच्या निष्पक्ष आणि अभ्यासू दृष्टिकोनाची साक्ष देते.
इक्बाल यांचे पुत्र जावेद इक्बाल पुढे लिहितात, हिंदूंना सर्वसामान्यपणे आणि ब्राह्मणांना विशेषतः आपल्या पूर्वजांच्या ब्राह्मण असण्याचा मोठा अभिमान राहिला आहे. कदाचित याच कारणास्तव अरबी व संस्कृतचे विद्वान पंडित रामचंद्र देहलवी यांनी इक्बाल यांच्यावरील एका लेखात लिहिले होते: "ईश्वरी ज्ञान आणि ईश्वराची वाणी केवळ एका ब्राह्मण कुळात जन्मलेला माणूसच समजून घेऊ शकतो. यात इक्बाल यांनी कोणते रहस्य दडवले आहे? हेच की ते कश्मीरी पंडित होते. हजारो वर्षे त्यांच्या पूर्वजांनी अध्यात्माच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तित्वाची घडण केली होती."
(संदर्भ: जिंदा रूद, जस्टिस जावेद इक्बाल, पृष्ठ ३३)
सर्वधर्मांचा आदर अन् बंधुभावाची शिकवण
इक्बाल एक मुस्लिम ब्राह्मण होते, इस्लामचे निष्ठेने पालन करणारे होते; तरीही आपल्या जन्मभूमीच्या सांस्कृतिक परंपरा आणि सर्व धर्मांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. भारत म्हणजे केवळ एक भौगोलिक तुकडा नसून विविध संस्कृती, धर्म आणि सभ्यतांचा सुंदर संगम आहे, अशी त्यांची धारणा होती. या भूमीवरील सर्व समुदायांमध्ये प्रेम अन् बंधुभाव राहावा, यासाठी ते नेहमी आग्रही राहिले.
एकीकडे त्यांनी 'मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा' ही अजरामर रचना रचली. तर दुसरीकडे, अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात भाषण करताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुनरुच्चार केला:
"जो समुदाय इतर समुदायांबद्दल मनात आकस धरतो, तो नीच अन् क्षुद्र आहे. मी इतर समुदायांचे रीतीरिवाज, कायदे, सामाजिक आणि धार्मिक संस्थांचा मनःपूर्वक आदर करतो. इतकेच नव्हे तर कुराणच्या शिकवणीनुसार वेळ पडल्यास त्यांच्या पूजास्थळांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे."
(संदर्भ: अल्लामा इक्बाल यांचे अलाहाबाद येथील भाषण, पृष्ठ १०६)
या विधानाचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. भारतातील हिंदू, शीख, ख्रिस्ती आणि पारशी अशा सर्वच धर्माच्या लोकांबद्दल ते आदर व्यक्त करत होते. पुढे जाऊन कुराणचा दाखला देत, गरजेच्या वेळी इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचे रक्षण करणे हे मुस्लिमांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
इक्बाल यांचे स्नेही आणि इतिहासकार मुहम्मदुद्दीन फौक यांच्या हवाल्याने प्राध्यापक जगन्नाथ आझाद लिहितात, "मानवजातीच्या कल्याणासाठी या देशातील मुस्लिम आणि हिंदूंमध्ये समेट अन् सलोखा असणे मला अत्यंत आवश्यक वाटते. या देशातील नागरिकच जुन्या जगाच्या अवशेषांवर नव्या माणसासाठी नवे जग निर्माण करण्याची क्षमता बाळगून आहेत."
(संदर्भ: इक्बाल आणि काश्मीर, जगन्नाथ आझाद - मशाहीर-ए-काश्मीर, पृष्ठ ४१)
इक्बाल यांना केवळ हिंदू-मुस्लिम सलोखा नको होता, तर दोन्ही समुदायांनी एकत्र येऊन एका नव्या जगाची निर्मिती करावी, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. आपल्या आयुष्यात त्यांनी धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या मित्रपरिवारात मुस्लिमांइतकाच हिंदू मित्रांचाही भरणा होता.
प्राध्यापक जगन्नाथ आझाद यांनी फौक यांच्या हवाल्याने पुढे लिहिले आहे, "इंग्रजी आणि इस्लामिक तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त आपण हिंदू तत्त्वज्ञानाचाही गाढा अभ्यास केला आहे. म्हणूनच आपण सर्व धर्मांचा मनापासून आदर करता. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांमध्ये आपल्याला समान प्रेम आणि आदर मिळतो."
(संदर्भ: इक्बाल आणि काश्मीर, प्रा. जगन्नाथ आझाद, पृष्ठ ३८)
खरा ज्ञानी माणूस कधीही दुसऱ्या धर्माचा किंवा संस्कृतीचा अनादर करू शकत नाही. अल्लामा इक्बाल यांचे अफाट ज्ञान, खुली विचारसरणी आणि धार्मिक सहिष्णुता यातून स्पष्टपणे दिसते. पाश्चात्य अन् इस्लामिक विचारांसोबतच हिंदू तत्त्वज्ञानाचा मूलगामी अभ्यास केल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची व्यापकता आणि समतोल होता. कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने न बघता, केवळ अभ्यास, न्याय आणि निष्पक्षतेच्या दृष्टीने बघण्याची त्यांची पद्धत आजच्या काळातही तितकीच मार्गदर्शक ठरते.