गुवाहाटी
आसाम पोलिसांनी दहशतवादी संघटनांविरोधात राबवलेल्या धडक मोहिमेत पाकिस्तानस्थित 'शहजाद भट्टी नेटवर्क' (SBN) या दहशतवादी सिंडिकेटच्या आणखी एका संशयित ऑपरेटिव्हला अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांच्या विशेष पथकाने (STF) हैलाकांडी जिल्ह्यातून बुधवारी ही महत्त्वाची कारवाई केली. यापूर्वी २५ जुलै रोजी एसटीएफने धुब्री, चिरांग आणि बारपेटा जिल्ह्यातून याच नेटवर्कच्या इतर तीन ऑपरेटिव्ह्जना अटक केली होती.
पूर्वीच्या अटकेदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि सततच्या तपासाच्या आधारे, एसटीएफने हैलाकांडी पोलिसांच्या मदतीने रामनाथपूर परिसरात संयुक्त मोहीम राबवून २१ वर्षीय संशयिताला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. राष्ट्रविरोधी नेटवर्कविरुद्धची कारवाई सातत्याने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सरकारी निवेदनानुसार, 'शहजाद भट्टी नेटवर्क' हे पाकिस्तानमधून चालवले जाणारे एक दहशतवादी सिंडिकेट आहे, जे भारतभर ग्रेनेड, आयईडी आणि पेट्रोल बम हल्ले तसेच टार्गेटेड किलिंग्सच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे नेटवर्क स्थानिक संपर्कातील लोकांना पैसे देऊन पोलीस, संरक्षण आणि धार्मिक ठिकाणांची रेकी करण्यासाठी तसेच हेरगिरीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करत होते.