अमेरिकेच्या ग्रीन कार्ड निलंबनाचा TCS वर परिणाम होणार नाही; कंपनीचे स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
टाटा कंपनीची इमारत
टाटा कंपनीची इमारत

 

नवी दिल्ली 

अमेरिकेने ग्रीन कार्ड आणि परमनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राममधून (PERM) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससह (TCS) आठ प्रमुख आयटी कंपन्यांना निलंबित केल्यानंतर, टीसीएसने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीचे पर्म (PERM) अर्ज अत्यंत कमी म्हणजे सिंगल डिजिटमध्ये असल्याने या निलंबनाचा आपल्या वर्कफोर्स धोरणावर आणि ग्राहक संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण टीसीएसने दिले आहे.

स्थानिक भरतीवर आमचा मुख्य भर

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, युएस लेबर डिपार्टमेंटच्या कोणत्याही निर्देशाचे टीसीएस पालन करेल. अमेरिकेतील आमचे वर्कफोर्स धोरण स्थानिक प्रतिभेला कामावर ठेवण्यावर आणि मजबूत कॅम्पस रिक्रूटमेंट मॉडेलवर आधारित आहे. देशभरातील ३१ कार्यालये आणि डिलिव्हरी सेंटरमध्ये कंपनीने आधीच एक मजबूत स्थानिक कर्मचारी वर्ग तयार केला आहे. यापूर्वी घोषित केल्यानुसार, पुढील पाच वर्षांत अमेरिकेत आणखी १५ हजार स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा कंपनीचा मानस आहे.

नास्कॉमची प्रतिक्रिया

दरम्यान, उद्योग संघटना नास्कॉमने म्हटले आहे की, इमिग्रेशन आणि कुशल टॅलेंट मोबिलिटी हे दोन वेगवेगळे विषय आहेत आणि त्यांना एकाच दृष्टिकोनातून पाहता कामा नये. एच-१बी व्हिसा कार्यक्रम अमेरिकेतील तात्पुरत्या कौशल्याची पोकळी भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असला, तरी भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत या व्हिसावरचे अवलंबित्व काफी प्रमाणात कमी केले आहे, असे नास्कॉमने स्पष्ट केले.