भक्ती चाळक
आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे प्रसिद्धीच्या झगमगाटात राहूनही शांतपणे लोकांचे आयुष्य उजळवण्याचे काम करतात. अशाच संवेदनशील व्यक्तींच्या आयुष्यातील मनाला भिडणाऱ्या प्रसंगांचा पट आम्ही ‘एक कहाणी’ या खास मालिकेतून उलगडत आहोत. आजची कथा आहे बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते फारुख शेख त्यांच्या एका दातृत्वाची.
‘ताज’मधील ती काळी
२६ नोव्हेंबर २००८ चा तो दिवस संपूर्ण देशासाठी काळरात्र ठरला. मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी भयंकर हल्ला केला. या हॉटेलमध्ये मेंटेनन्स वर्कर म्हणून काम करणारे राजन कांबळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक पाहुण्यांना सुरक्षित बाहेर काढले. पण दुर्दैवाने दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.
राजन याच्या मृत्यूने पत्नी श्रुती कांबळे आणि त्यांच्या दोन लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वृत्तपत्रांमध्ये राजन कांबळे यांच्या बलिदानाची बातमी प्रसिद्ध झाली. ही बातमी अभिनेते फारुख शेख यांच्या वाचनात आली. राजन यांच्या बलिदानाने फारुख शेख यांचे मन हेलावून गेले. त्यांनी या कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले.
मदत करण्यापूर्वी एकच अट
फारुख शेख यांनी वृत्तपत्राच्या दफ्तराशी संपर्क साधला आणि राजन कांबळे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च स्वतः उचलण्याची तयारी दर्शवली. पण त्यांनी या मदतीसोबत एक अट घातली. त्यांनी खडसावून सांगितले, “माझी ही मदत पूर्णपणे गुप्त राहील. माझे नाव कांबळे कुटुंबाला किंवा बाहेर कोणालाही कळता कामा नये!”
प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वृत्तपत्राचे प्रतिनिधी फारुख शेख यांना फोन करून फीची रक्कम सांगायचे. फारुख शेख लगेचच चेक पाठवून द्यायचे. हा पैसा कुठे अन् कसा खर्च झाला, याबद्दल त्यांनी पाच वर्षांत एकदाही चौकशी केली नाही.
देवदूत निघून गेला... अन् मग उलगडले रहस्य
सलग पाच वर्षे श्रुती कांबळे आणि त्यांच्या दोन मुलांना आपल्याला दरवर्षी मदतीचा चेक पाठवणारा तो अनोळखी माणूस कोण आहे, हे माहीतच नव्हते. पैशांची कमतरता भासली की तो अनाम देवदूत मदतीला धावून यायचा. परंतु २८ डिसेंबर २०१३ ला फारुख शेख यांनी अचानक जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतरच कांबळे कुटुंबाला या देवदूतबद्दल समजले.
ज्या माणसाने सलग ५ वर्षे त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाहिली, तो दुसरा कोणी नसून बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता फारुख शेख होता, हे सत्य समोर आले. पण दुर्दैवाने हे समजले तेव्हा फारुख शेख यांना प्रत्यक्ष भेटून आभार मानण्याची वेळ निघून गेली होती.
आपल्या भावना व्यक्त करताना श्रुती म्हणाल्या, “ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाने आमची नक्कीच पूर्ण काळजी घेतली. पण जर शेख साहेब नसते, तर माझ्या मुलांनी इथपर्यंत पोहोचण्याचे स्वप्नही पाहिले नसते. ज्या वेळी आमच्या अगदी जवळच्या माणसांनी आमची साथ सोडली होती, त्या वेळी एका अनोळखी माणसाने आम्हाला सावरले. तो अनाम देवदूत कोण होता हे आज मी माझ्या मुलांना अभिमानाने सांगू शकते.”
वडीलांच्या पावलावर पाऊल
फारुख शेख यांनी लावलेल्या या ज्ञानाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. श्रुती कांबळे यांचा लहान मुलगा मन लावून अभ्यास करतोय. मोठा मुलगा रोहन याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, त्याच ताज हॉटेलमध्ये काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
२६/११ च्या त्या भयंकर घटनेनंतर अनेक दुःखाच्या गोष्टी समोर आल्या. पण फारुख शेख यांच्या या गुप्त दातृत्वाची गोष्ट त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतेय. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून शांतपणे समाजसेवा कशी करावी, याचा एक वस्तुपाठच फारुख शेख यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे.