जयंती विशेष : पद्मभूषण हकीम अब्दुल हमीद यांचा प्रेरणादायी प्रवास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 44 m ago
जामिया हमदर्द विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण हकीम अब्दुल हमीद
जामिया हमदर्द विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण हकीम अब्दुल हमीद

 

प्रा. (डॉ.) एम. अफशार आलम

दक्षिण दिल्लीत वसलेल्या अन् नामांकित 'जामिया हमदर्द' या अभिमत विद्यापीठाची स्थापना करणारे हकीम अब्दुल हमीद यांची १४ सप्टेंबर रोजी जयंती साजरी केली जाते. १४ सप्टेंबर १९०८ रोजी दिल्लीत जन्मलेले हकीम साहेब हे फक्त एक नामांकित वैद्य नव्हते, तर त्यांनी आपल्या वैद्यकीय वारशाचे रुपांतर शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा आणि समाजसेवेच्या एका भव्य चळवळीत केले.

'हमदर्द' नावातील करुणेचा झरा
हकीम साहेबांचे कुटुंब वैद्यकीय आणि सामाजिक सेवेशी घट्ट जोडलेले होते. त्यांचे वडील हकीम हाफिज अब्दुल मजीद यांनी १९०६ मध्ये 'हमदर्द दवाखान्याची' पायाभरणी केली. उर्दू भाषेत 'हमदर्द' या शब्दाचा अर्थ 'दुसऱ्याचे दुःख समजून घेणारा अन् सहानुभूती दाखवणारा' असा होतो.

वडिलांकडून मिळालेला हाच विचार हकीम अब्दुल हमीद यांच्या संपूर्ण आयुष्याचा मुख्य मार्गदर्शक ठरला. त्यांना वडिलांकडून फक्त एक व्यवसाय मिळाला नव्हता, तर समाजाप्रती असलेली एक मोठी जबाबदारी मिळाली होती. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय सेवा अन् मदतीचा हात पोहोचावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट उपसले.

युनानी वैद्यकशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाचा सुरेख संगम
हकीम अब्दुल हमीद हे युनानी वैद्यकशास्त्राचे निष्णात तज्ज्ञ होते; परंतु त्यांची दृष्टी केवळ आजारांवर उपचार करण्यापुरती मर्यादित नव्हती. युनानी वैद्यकशास्त्र पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर त्याला पद्धतशीर शिक्षण, कठोर संशोधन आणि आधुनिक शास्त्रीय पद्धतींची जोड देणे गरजेचे आहे, हे त्यांनी वेळीच ओळखले.

प्राचीन आणि पारंपरिक वैद्यकशास्त्र हे आधुनिक विज्ञानाच्या विरोधी नाही, असे त्यांचे ठाम मत होते. प्राचीन ज्ञानाचे रक्षण करत संशोधनाच्या आधारे त्याला अधिक मजबूत केले जाऊ शकते, या विचाराने त्यांना युनानी वैद्यकीय क्षेत्रातील एक भक्कम स्तंभ बनवले.

१९४७ चे वादळ अन् भविष्याची दूरदृष्टी
१९४७ हे वर्ष देशासाठी अत्यंत कठीण अन् आव्हानात्मक होते. फाळणीच्या दुःखात लाखो कुटुंबे होरपळली होती. चोहीकडे अविश्वास, हिंसाचार आणि अनिश्चिततेचे सावट पसरले होते. अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही हकीम अब्दुल हमीद भविष्यातील भारतासाठी संस्थांची उभारणी करण्याचा विचार करत होते.

त्याच काळात त्यांनी 'हमदर्द चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना केली. 'हमदर्द'मधून मिळणारा सर्व नफा त्यांनी समाजाच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. स्वतःसाठी संपत्ती जमा न करता, ती समाजाची अमानत मानून लोककल्याणासाठी खर्च करणे, यावरून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते.

संस्थांची मालिका अन् 'जामिया हमदर्द'चे स्वप्न
यानंतर हकीम साहेबांनी शैक्षणिक अन् सामाजिक संस्थांची एक अखंड साखळीच निर्माण केली.

१९६३: 'हमदर्द तिब्बी कॉलेज' आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडीज'ची स्थापना.

१९६४: 'हमदर्द नॅशनल फाउंडेशन'ची सुरुवात.

१९७२: 'हमदर्द कॉलेज ऑफ फार्मसी'ची उभारणी.

हळूहळू या प्रवासात हमदर्द एज्युकेशन सोसायटी, हमदर्द पब्लिक स्कूल, गालिब अकादमी आणि हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टोरिकल रिसर्च यांसारख्या संस्था जोडल्या गेल्या. वैद्यकीय उपचारांसोबतच औषधनिर्माण, शिक्षण, इतिहास, संस्कृती अन् संशोधन एकाच छताखाली फुलावे, असा त्यांचा ध्यास होता.

या दीर्घकालीन प्रयत्नांचे फलित म्हणजे १९८९ मध्ये या सर्व संस्थांना एकत्र आणून 'जामिया हमदर्द' या अभिमत विद्यापीठाची (Deemed University) स्थापना झाली. हकीम साहेब या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती बनले. विशेष म्हणजे, या विद्यापीठाच्या उभारणीत कोणताही मोठा कॉर्पोरेट गट किंवा सरकारी यंत्रणा नव्हती. एका व्यक्तीचा शिक्षण अन् समाजसेवेवरील ठाम विश्वास आणि स्वतःची संपत्ती याच्या जोरावर ही संस्था उभी राहिली.

शरीर अन् मनावर फुंकर घालणारा महात्मा
हकीम अब्दुल हमीद यांना फक्त संस्थांचे निर्माते म्हणून लक्षात ठेवणे त्यांच्या महानतेवर अन्याय ठरेल. ते मूळचे संवेदनशील वैद्य होते. माणसाच्या वेदना जाणणे हा त्यांचा सहज स्वभाव होता.

त्यांच्या दृष्टीने एखाद्या आजारी माणसावर उपचार करणे आणि एका गरीब मुलाला शिक्षणाची संधी मिळवून देणे, या दोन्ही गोष्टी एकाच करुणेच्या भावनेतून येत होत्या. औषधाने शरीराचे आजार बरे होतात, तर शिक्षणाने मनाचे पोषण होते. या दोन्ही गोष्टींना त्यांनी समाजसेवेच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या. म्हणूनच त्यांच्या संस्थांमध्ये रुग्णालयांसोबतच इतिहास, संस्कृती अन् मानव्यविद्या (Humanities) या विषयांनाही तितकेच महत्त्वाचे स्थान मिळाले.

जागतिक सन्मान अन् नम्र व्यक्तिमत्त्व
हकीम साहेबांच्या या महान योगदानाला देश-विदेशातून मोठा सन्मान मिळाला:

१९६५: भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कार.

१९८३: तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून मानाचा 'इब्न सिना' (Avicenna) पुरस्कार.

१९९२: भारत सरकारचा सर्वोच्च 'पद्मभूषण' पुरस्कार.

अंतिम वर्षे: अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

पुरस्कार अन् सन्मानांपेक्षा एखाद्या गरजू रुग्णाला उपचार मिळणे किंवा एका गरीब विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होणे, यातच हकीम साहेबांना खरा आनंद मिळत असे.

झाड लावणारा विचारवंत अन् जिवंत वारसा
१९९९ मध्ये हकीम अब्दुल हमीद यांनी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे. आज हजारो विद्यार्थी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, लाखो रुग्णांवर रुग्णालयांत मोफत अन् अल्पदरात उपचार होत आहेत.

ज्याप्रमाणे एक सुज्ञ माणूस सावलीत बसण्याची अपेक्षा न ठेवता पुढच्या पिढ्यांसाठी झाड लावतो, अगदी तसेच हकीम साहेबांनी या सर्व संस्थांची रोपे लावली. 'जामिया हमदर्द'चा हा परिसर केवळ इमारतींचा समूह नाही, तर स्वतःचा विचार बाजूला ठेवून समाजाचा विचार केल्यास केवढे मोठे पर्व उभे राहू शकते, याचे जिवंत उदाहरण आहे!

'हमदर्द' या शब्दाचा गाभा जपून दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालणे अन् हा समृद्ध वारसा पुढे नेणे, हीच हकीम अब्दुल हमीद यांना खरी आदरांजली ठरेल!

(लेखक हे जामिया हमदर्दचे माजी कुलगुरू)
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter