मध्य पूर्वेतील संकट रोखण्यासाठी इराण-जीसीसी बैठकीची तयारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 51 m ago
नवी दिल्लीतील ब्रिक्स परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान
नवी दिल्लीतील ब्रिक्स परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान

 

मध्य पूर्वेत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यात उच्चस्तरीय द्विपक्षीय भेट पार पडली.

गेल्या काळातील तणाव मागे टाकण्याचा निर्णय
या महत्त्वाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, दोन्ही देशांनी दीर्घकाळापासून चाललेला लष्करी आणि मुत्सद्दी तणाव बाजूला ठेवून संबंध नव्याने मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. फारसच्या आखाती क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या असल्या तरी अबू धाबीच्या क्राऊन प्रिन्ससोबत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक होती. भूतकाळातील वाद मागे टाकून भविष्याकडे एकत्र पाहत परस्पर सहकार्याने पुढे जाण्यावर दोन्ही देशांचे ऐक्य झाले आहे.

इराण-जीसीसी बैठक अन् अमेरिकेची भूमिका
क्षेत्रीय तणाव कमी करण्यासाठी इराण आता ओमानमध्ये गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल (GCC) देशांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकीत होर्मुज सामुद्रधुनीची सुरक्षा आणि आखाती प्रदेशातील शांततेवर चर्चा होणार आहे. दरम्यान, इराण आणि खाडी देशांमधील या चर्चेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, खाडी देश तेहरानसोबत चर्चा करतात की नाही हा संपूर्णपणे त्यांचा अंतर्गत आणि खाजगी विषय असून मला त्याबाबत कोणतीही अडचण नाही.

होर्मुज सामुद्रधुनी आणि लष्करी तणाव
जागतिक तेल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुज सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. यूएईमधील अमेरिकन लष्करी तळावरून इराणविरोधात कारवाया होत असल्याच्या मुद्द्यावर इराणने आक्षेप घेतला होता. मात्र, या बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, इराणचा यूएई किंवा शेजारील आखाती देशांवर कोणताही आक्षेप नाही. शेजारील देशांनी आपल्या जमिनीचा किंवा लष्करी तळांचा वापर शत्रू राष्ट्रांना एकमेकांवर हल्ले करण्यासाठी करू देऊ नये, असे आवाहन इराणने केले आहे.