ब्रिक्स परिषदेदरम्यान पुतीन, शी जिनपिंग यांच्यासह अनेक राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधान मोदींची महत्त्वाची चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र आणि इतर जागतिक नेते
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र आणि इतर जागतिक नेते

 

राजधानी नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे आयोजित १८ वी ब्रिक्स शिखर परिषद (BRICS Summit) अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी मुत्सद्देगिरीचा ठसा उमटवणाऱ्या या परिषदेत शुक्रवारी दुपारी ते रविवारी उशिरापर्यंत जागतिक नेत्यांच्या उपस्थितीने भारत मंडपम गजबजले होते.
 
या काळात पंतप्रधान मोदींनी विविध सत्रांना संबोधित करण्यासोबतच १५ हून अधिक देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. तीन दिवसांच्या गहन बहुपक्षीय वाटाघाटींनंतर जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी स्वदेशाकडे रवाना झाले आहेत.

जागतिक नेत्यांची नवी दिल्लीतून रवानगी
परिषद संपल्यानंतर सोमवारी पहाटेपासूनच विविध देशांचे प्रमुख आणि उच्चपदस्थ अधिकारी मायदेशी रवाना झाले. बुरुंडीचे अध्यक्ष एरिस्ट नदयीशिमिये, त्यांच्या पत्नी अँजेलिन नदयीशिमिये, नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्री बिआन्का ओडुमेगू-ओजुक्वू, ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्हिएरा आणि जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) महासंचालक नगोझी ओकोंजो-इवेला यांनी नवी दिल्लीचा निरोप घेतला.
 
यापूर्वी रविवारी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस, थायलंडचे उपमुख्यमंत्री सिहासाक फुआंगकेटकेओ, फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनँड मार्कोस ज्युनियर आणि बेलारूसचे परराष्ट्र मंत्री मॅक्सिम रायझेनकोव्ह मायदेशी रवाना झाले होते.

पुतीन, शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दी दिनचर्येची सुरुवात शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीने झाली. त्यानंतर त्यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि यूएन सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. शनिवारी हैदराबाद हाऊस येथे इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद आणि व्हिएतनामच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठका पार पडल्या. त्यानंतर भारत मंडपम येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेली पंतप्रधान मोदींची बैठक जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

समावेशक विकास अन् पर्यावरण रक्षणाचा संदेश
परिषदेदरम्यान ब्रिक्स नेत्यांनी 'सर्वसमावेशक जागतिक शासन आणि बहुपक्षीयता मजबूत करणे' या विषयावरील बंदिस्त सत्रात भाग घेतला. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नेत्यांनी 'भारत इनोव्हेट्स' प्रदर्शनाला भेट दिली, पारंपारिक कौटुंबिक छायाचित्र (Family Photograph) काढले आणि भारत मंडपमच्या प्रांगणात संयुक्त वृक्षारोपण केले. 

रविवारी 'रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी' या संकल्पनेवर आधारित सत्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी समावेशक जागतिक विकासाचा रोडमॅप मांडला. या सत्रादरम्यान कझाकस्तान, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, बुरुंडी, नायजेरिया आणि युगांडाच्या प्रतिनिधींशीही त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली.