ग़ौस सिवानी
भारताच्या भूमीने अनेक महान सुफी, संत, विचारवंत आणि तत्त्वज्ञ जन्माला घातले. या महापुरुषांनी जगाला शांतता, बंधुभाव अन् राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. या जगद्वंद्य संतांच्या यादीत गुरु नानक देवांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. समाजातील भेदभाव मिटवण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले आणि लोकांमध्ये एक नवी वैचारिक चेतना जागवली. त्यांच्या या युगप्रवर्तक कार्याची प्रत्येक काळातील विचारवंतांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
महाकवी अल्लामा इक्बाल हेसुद्धा गुरु नानक देवांच्या व्यक्तिमत्त्वाने अन् तत्त्वज्ञानाने भारावून गेले होते. गुरु नानक देवांच्या महानतेला वंदन करण्यासाठी इक्बाल यांनी एक अजरामर कविता लिहिली. धार्मिक सलोखा, समता, बंधुता आणि नैतिक मूल्यांचा संदेश देणारी ही कविता आजही तितकीच लोकप्रिय आहे.
कोण होते गुरु नानक देव?
गुरु नानक देव हे भारताचे महान अध्यात्मिक गुरु, समाजसुधारक आणि कवी होते. सिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु म्हणून संपूर्ण जग त्यांना ओळखते. त्यांनी देश-विदेशांत भ्रमंती करून लोकांना 'एक ओंकार' म्हणजेच ईश्वर एकच आहे, हा मूलमंत्र दिला. याच विचारांवर आधारित त्यांनी एक आध्यात्मिक अन् सामाजिक जीवनदर्शन मांडले. त्यांचा हा मार्ग समता, बंधुता आणि परोपकारावर आधारित होता. त्यांच्या अमूल्य रचना 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये सुरक्षित आहेत.
पंजाबमधील ननकाना साहिब (सध्या पाकिस्तान) येथे १५ एप्रिल १४६९ रोजी गुरु नानक देवांचा जन्म झाला. आज त्यांच्या जन्मस्थळावर एक भव्य गुरुद्वारा उभारलेला आहे. २२ सप्टेंबर १५३९ रोजी वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी देहत्याग केला.
गुरु नानक देवांच्या कुटुंबाचे मुस्लिमांशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांचे वडील कल्याण चंद दास बेदी (मेहता कालू) हे राय बुलार या मुस्लिम जमीनदाराकडे काम करायचे. त्यांच्या जन्माच्या वेळी माता तृप्ता यांची काळजी 'दौलत' नावाच्या मुस्लिम सुईणीने घेतली होती. लहानपणीचे त्यांचे परममित्र 'भाई मर्दाना' हे मुस्लिम होते आणि रबाब वाजवायचे. गुरु नानक देवांच्या संपूर्ण जीवनप्रवासात आणि उदासी (प्रचार) यात्रांमध्ये भाई मर्दाना सावलीसारखे सोबत राहिले.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना मौलवी सय्यद हसन यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले. तिथे त्यांनी फारसी, अरबी आणि इस्लामिक साहित्याचा अभ्यास केला. त्यांचे मेहुणे जय राम हे लाहौरचे गव्हर्नर दौलत खान लोदी यांच्याकडे सेवेत होते.
बालपणापासूनच गुरु नानक देवांच्या मनात अन्यायाविरुद्ध चिड होती. वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा जनेऊ आणि मुंडन संस्काराचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी या कर्मकांडाला स्पष्ट नकार दिला. याच वयापासून त्यांनी रचना लिहायला सुरुवात केली. पुढे माता सुलखनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना दोन मुले झाली.
इक्बाल यांची 'नानक' कविता
अल्लामा इक्बाल हे गुरु नानक देवांच्या विचारांनी प्रचंड प्रभावित होते. त्यांनी आपल्या 'नानक' या प्रसिद्ध कवितेतून गुरु नानक देवांच्या महान कार्याला आदरांजली वाहिली आहे. या कवितेत त्यांनी गुरु नानक देवांना भारताच्या अध्यात्मिक प्रबोधनाचे अग्रदूत म्हटले आहे. गौतम बुद्ध, तत्कालीन भारतीय समाज, जातीव्यवस्था आणि गुरु नानक देवांचे प्रबोधन या सर्वांचा पट इक्बाल यांनी या कवितेत मांडला आहे.
क़ौम ने पैग़ाम-ए-गौतम की ज़रा परवा न की
क़द्र पहचानी न अपने गौहर-ए-यक दाना की
इक्बाल लिहितात, भारताने गौतम बुद्धांच्या महान विचारांची योग्य कदर केली नाही. बुद्ध हे अमूल्य रत्नासारखे होते, पण समाजाने त्यांची महानता ओळखली नाही. बुद्धांचा संदेश माणुसकी, दया, समता आणि चांगल्या आचरणावर आधारित होता.
आह बदक़िस्मत रहे आवाज़-ए-हक़ से बेख़बर
ग़ाफ़िल अपने फल की शीरीनी से होता है शजर
सत्याच्या आवाजापासून लोक अनभिज्ञ राहिले, याचे दुःख व्यक्त करताना इक्बाल म्हणतात, जसे एखाद्या झाडाला स्वतःच्या फळाची गोडी ठाऊक नसते, तसेच भारताला आपल्या महान संतांच्या शिकवणीचे मोल कळाले नाही.
आश्कार उस ने किया जो ज़िंदगी का राज़ था
हिंद को लेकिन ख़याली फ़लसफ़ा पर नाज़ था
गौतम बुद्धांनी मानवी दुःखांचे मूळ आणि त्यातून मुक्तीचा सोपा मार्ग जगाला दाखवला. पण तत्कालीन समाज या प्रत्यक्ष आचरणात आणायच्या शिकवणीऐवजी काल्पनिक तत्त्वज्ञानाच्या चर्चांमध्येच अडकून राहिला.
शम्अ-ए-हक़ से जो मुनव्वर हो ये वो महफ़िल न थी
बारिश-ए-रहमत हुई लेकिन ज़मीं क़ाबिल न थी
बुद्धांची शिकवण म्हणजे सत्याचा प्रकाश होता, पण समाज तो स्वीकारण्यासाठी तयार नव्हता. आकाशातून कृपेचा वर्षाव तर झाला, पण जमीन सुपीक नसल्याने त्याचे सोने होऊ शकले नाही.
आह शूद्र के लिए हिंदोस्ताँ ग़मख़ाना है
दर्द-ए-इंसानी से इस बस्ती का दिल बेगाना है
जातीव्यवस्थेच्या विषमतेवर प्रहार करताना इक्बाल म्हणतात, शोषित आणि उपेक्षित वर्गाचे आयुष्य दुःखाने भरलेले होते. मानवी वेदनेशी समाजाला काहीही देणेघेणे नव्हते.
बरहमन सरशार है अब तक मय-ए-पिंदार में
शम्अ-ए-गौतम जल रही है महफ़िल-ए-अग़यार में
समाजातील वरचा वर्ग अहंकातच बुडालेला राहिला, तर बुद्धांच्या विचारांचा दिवा मात्र परक्या देशांमध्ये पेटत राहिला. बौद्ध धर्म चीन, जपान, श्रीलंका या देशांत पसरला, पण स्वतःच्या भूमीत मात्र त्याला ते स्थान मिळाले नाही.
बुतकदा फिर बाद मुद्दत के मगर रोशन हुआ
नूर-ए-इब्राहीम से आज़र का घर रोशन हुआ
दीर्घ काळानंतर या भूमीत पुन्हा एकदा सत्याचा प्रकाश पसरला. जसा हजरत इब्राहिम यांच्या शिकवणीने आझरचे घर उजळून निघाले होते, तद्वतच गुरु नानक देवांच्या आगमनाने भारतात पुन्हा एकदा अध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले.
फिर उठी आखिर सदा तौहीद की पंजाब से
हिंद को इक मर्द-ए-कामिल ने जगाया ख़्वाब से
पंजाबच्या भूमीतून गुरु नानक देवांनी ईश्वर एक असल्याचे आणि समतेचे तुतारी वाजवून घोषणा केली. जातीभेद, धार्मिक कर्मकांड आणि अज्ञानाच्या झोपेतून भारताला एका 'मर्द-ए-कामिल'ने (परिपूर्ण महापुरुषाने) जागे केले.
गुरु नानक अन् इक्बाल: विचारांचा संगम
गुरु नानक देव आणि अल्लामा इक्बाल दोन वेगळ्या कालखंडातील आणि परंपरेतील व्यक्तिमत्त्वे होती. पण दोघांमध्ये अनेक गोष्टींचे अनोखे साम्य आढळते. दोघांची कर्मभूमी पंजाब होती. दोघांची मातृभाषा पंजाबी होती आणि दोघांचा जन्म नोव्हेंबर महिन्यातच झाला होता.
दोघांच्या विचारांचा केंद्रबिंदू ईश्वर आणि माणुसकी हाच होता. गुरु नानक देवांनी विषमतेविरुद्ध लढा देत अहोरात्र कार्य केले. इक्बाल यांनीसुद्धा आपल्या लेखणीतून समता अन् माणुसकीचा संदेश दिला.
गुरु नानक देवांनी ईश्वराचे स्मरण आणि निष्काम समाजसेवेला आयुष्याचे ध्येय मानले. इक्बाल यांनीसुद्धा मानवी आयुष्याचे यश ईश्वराशी जोडले जाण्यातच मानले. गुरु नानक देवांनी सामाजिक वाईट रुढींवर प्रहार केले, तर इक्बाल यांनीसुद्धा कुप्रथांवर बोट ठेवत लोकांना नैतिकतेचा मार्ग दाखवला.
दोघांच्या विचारांवर सुफी परंपरेचा मोठा प्रभाव होता. गुरु नानक देवांच्या शिकवणीत सुफी विचारांची सुरेख झलक दिसते. याच सौहार्दाचे प्रतीक म्हणून अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची (गोल्डन टेम्पल) पायाभरणी एका मुस्लिम सुफी संताच्या (हजरत मियां मीर) हस्ते करण्यात आली होती. आजही सिख परंपरेत सुरू असलेली 'लंगर' आणि 'सेवा' ही याच विचारांची निष्पत्ती आहे.
दुसऱ्या बाजूला इक्बाल हेसुद्धा सुफी संतांच्या विचारांनी प्रेरित होते. कर्महीन बनून राहण्याऐवजी समाजात उतरून काम करण्याचा सल्ला ते द्यायचे. मनाची शुद्धता, सचोटी आणि सत्कर्मावर त्यांचा सदैव भर राहिला.
गुरु नानक देव आणि इक्बाल यांच्या विचारसरणीत काही तात्विक फरक नक्कीच होते, पण मानवतेचे कल्याण, ईश्वरावरील श्रद्धा आणि भेदभावरहित समाज या मुद्द्यांवर दोघांचे एकमत होते. गुरु नानक देवांच्या रूपाने भारताला एक महान मार्गदर्शक लाभला, हे इक्बाल यांनी अत्यंत आदराने जगासमोर मांडले.