बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याने जानेवारी २०२५ मध्ये त्याच्या घरात झालेल्या चाकू हल्ल्याच्या भयावह घटनेच्या आठवणी ताज्या करत, त्या घटनेचा परिणाम आजही आपल्या मनावर कायम असल्याचे म्हटले आहे. या घटनेला मोठा काळ लोटूनही तो या मानसिक धक्क्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकलेला नाही.
करीना कपूर अजूनही मानसिक धक्क्यात
त्या कठीण काळाची आठवण सांगताना सैफने स्पष्ट केले की, त्याच्या कुटुंबाने मानसिकदृष्ट्या त्या परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची पत्नी करीना कपूर खान हिच्यासाठी हा अनुभव अत्यंत त्रासदायक होता. "आम्ही मानसिकदृष्ट्या त्या प्रसंगाला तोंड दिले, पण सर्वात मोठा धक्का करीनाला बसला कारण ती खूप संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत कोणासाठीही सामान्य राहणे सोपे नसते," असे सैफ म्हणाला.
"आजही धारदार वस्तू पाहिली की धक्का बसतो"
आपल्या स्वतःच्या मानसिक स्थितीबद्दल बोलताना सैफने कबूल केले की, तो आजही या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. "खरं सांगायचं तर मी आजपर्यंत त्या प्रसंगातून बाहेर पडू शकलेलो नाही. आजही जेव्हा मी कोणतीही धारदार किंवा सुरा-चाकू पाहतो, तेव्हा मला धक्का बसतो," असे त्याने नमूद केले. हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राविषयी बोलताना तो म्हणाला की, "हल्लेखोराच्या हातातील शस्त्र तुटलेले होते. जर तो खरा 'राम्बो नाईफ' असता, तर कदाचित मी आज जिवंत उरलो नसतो."
हल्लेखोराला माफ करण्याची तयारी
हल्ल्यानंतर अंगावर गंभीर जखमा झाल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते, मात्र त्याचा जीव वाचला. हे आपल्या आयुष्यातील मोठे भाग्य असल्याचे मानत त्याने आता त्या हल्लेखोराला मनापासून माफ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या रात्री शरीरातून रक्त वाहत असताना एक वेगळीच शांतता जाणवल्याचे सांगत सैफ म्हणाला की, अपंगत्व घेऊन जगण्यापेक्षा योद्धा म्हणून मृत्यू स्वीकारणे मला मान्य होते. परंतु सुदैवाने आयुष्य पुन्हा मिळाले आणि या अनुभवाने जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.