श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीला पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त होणार असून, हा प्रदेश देश-विदेशातील चित्रपट निर्मात्यांसाठी पसंतीचे केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी गुरुवारी व्यक्त केला. श्रीनगर येथे पार पडलेल्या पहिल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या' (International Film Festival of Jammu and Kashmir) समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.
काश्मीरमधील निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक सिनेमॅटिक वारशावर प्रकाश टाकत मंत्री मुरुगन म्हणाले की, भारत आज जागतिक स्तरावर मीडिया, डिजिटल कंटेंट आणि व्हर्च्युअल रियालिटीचा मोठा केंद्र बनत आहे. 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेनमेंट समिट' (WAVES) सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सरकार सर्जनशील अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. स्थानिक तरुणांमध्ये चित्रपट निर्मिती, पटकथा लेखन आणि डिजिटल कथाकथनाबाबत वाढलेला उत्साह पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. काश्मीरमधील निसर्ग, साहित्य आणि संगीतामध्ये चित्रपट उद्योगाला मोठी चालना देण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले. स्थानिक कलागुणांना जगभरातील निर्मात्यांशी जोडणे आणि मुंबईतील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज' (IICT) सारख्या संस्थांच्या माध्यमातून काश्मिरी तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळवून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.