'आशा फॉरेव्हर': आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए. आर. रहमानचे विशेष गाणे प्रदर्शित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 52 m ago
मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान 'आशा फॉरेव्हर' गाणे रिलीज करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संगीतकार ए. आर. रहमान आणि मान्यवर.
मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान 'आशा फॉरेव्हर' गाणे रिलीज करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संगीतकार ए. आर. रहमान आणि मान्यवर.

 

मुंबई: 

भारतीय संगीतसृष्टीला आपल्या स्वर्गीय आवाजाने सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या महान पार्श्वगायिका भारतरत्न आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मजयंतीनिमित्त (८ सप्टेंबर) त्यांना सुरांच्या रूपाने आदरांजली वाहण्यात आली. जागतिक ख्यातीचे संगीतकार ए.आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेले 'आशा फॉरएव्हर' (Asha Forever) हे विशेष गाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दिमाखात रिलीज करण्यात आले.

मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संगीतकार ए.आर. रेहमान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आशा भोसले यांची नात जनाई भोसले आणि भोसले कुटुंबीयांचे इतर सदस्य आवर्जून उपस्थित होते.

आशा ताई म्हणजे ऊर्जेचा आणि उत्साहाचा अथांग सागर: मुख्यमंत्री

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले की, "आशाजींचे संपूर्ण आयुष्य आनंद, उत्साह आणि विलक्षण चैतन्याने भरलेले होते. त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन आणि संगीतावरील असीम प्रेम त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात स्पष्टपणे जाणवायचे. त्या अफाट ऊर्जा आणि उत्साहाचे मूर्तिमंत प्रतीक होत्या. 'आशा फॉरएव्हर' हे त्यांच्या स्मृतींना अर्पण केलेले अगदी जिवंत संगीतमय अभिवंदन आहे."

आशा ताईंचा आवाज हा एक असा अनुभव आहे, जो कधीही मलीन होऊ शकत नाही, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत त्यांचे गाणे रसिकांच्या कानावर पडत राहील, तोपर्यंत त्या संगीतप्रेमींच्या मनात अमर राहतील. त्यांच्या आठवणी कायम जतन करण्यासाठी दरवर्षी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

'आशाजी या महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या लेक': ए.आर. रेहमान 

या विशेष गाण्याविषयी बोलताना संगीतकार ए.आर. रेहमान यांनी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. "‘आशा फॉरएव्हर’ ही आशाजींना वाहिलेली आदरांजली आहे. आशाजी या केवळ महाराष्ट्र किंवा भारताच्या नव्हे, तर संपूर्ण जगाच्या लेक आहेत. त्यांचा हा अलौकिक आवाज आणि त्यांचा संगीतमय वारसा या जगात कायम अमर राहील," असे रेहमान यांनी म्हटले.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही आपल्या मनोगतातून आशा भोसले यांच्या जागतिक योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या आणि देशभरातील संगीतप्रेमींच्या मनाशी आशा ताईंचे अतूट स्थान आहे. त्यांनी मराठीसह विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये गाणी गाऊन भारतीय संगीताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.

संगीतविश्वाचे असे एक युग संपले... 

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात ८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी आपल्या खणखणीत, अष्टपैलू आणि मनमोहक आवाजाने दशकानुदशके रसिकांच्या मनावर राज्य केले. भारतीय संगीताच्या या महामेरूने १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीची मोठी हानी झाली असली, तरी त्यांच्या सुरांचा वारसा आजही तितकाच जिवंत आहे. त्यांच्या ९३ व्या जन्मजयंती निमित्त रिलीज झालेले 'आशा फॉरएव्हर' हे गाणे प्रत्येक संगीतप्रेमीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू आणणारे ठरले आहे.




Latest News