मोकी
चीनमधील मोकी येथे सुरू असलेल्या ज्युनियर महिला आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताच्या युवा महिला संघाने पाकिस्तानचा १९-० असा विक्रमी आणि दणदणीत पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत (Semi-finals) प्रवेश केला आहे. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले.
या सामन्यात भारताने तब्बल १९ गोल केले, तर १८ पेनल्टी कॉर्नर आणि एक पेनल्टी स्ट्रोक मिळवला. याउलट पाकिस्तानच्या संघातर्फे एकही गोल किंवा पेनल्टी कॉर्नर मिळवता आला नाही. आता शनिवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ कोरिया किंवा मलेशियाविरुद्ध पडणार आहे.
सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने ५ गोल करत मजबूत पकड निर्माण केली. पुजा साहू हिने ७ व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर रोहिणी ऐंद, तानश्री कडू यांनी गोल करत आघाडी वाढवली. सुखवीर कौरने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला, तर सानिका माने हिने मैदानी गोल करत पहिल्या क्वार्टरमध्ये ५-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचा धडाका सुरूच राहिला. मधु सिदार, गीता यादव, सानिका माने, तनुजा टोप्पो आणि पूजा मलिक यांनी गोल करत हाफ टाईमपर्यंत स्कोअर १०-० वर पोहोचवला.
तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्येही भारतीय खेळाडूंनी गोल करण्याची मालिका सुरूच ठेवली. पूर्णिमा यादव, सुप्रिया, कृष्णा शर्मा, बिनिमा धन आणि इतर खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. पूजा मलिक हिने हॅटट्रिक साधत सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. शेवटी रोहिणी ऐंद हिने ६० व्या मिनिटाला गोल करत भारताचा विजय १९-० असा निश्चित केला.