दिल्लीची १० वर्षीय न्यारा शर्मा बनली राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
 न्यारा शर्मा
न्यारा शर्मा

 

नवी दिल्ली

दिल्लीची अवघ्या १० वर्षे आणि तीन महिने वयाची युवा नेमबाज न्यारा शर्मा ही राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी (National Championship) पात्रता मिळवणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली आहे. भोपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरशालेय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात ३६३ गुणांची कमाई करत तिने हा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. या उल्लेखनीय यशानंतर आता ती आगामी राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीला लागली आहे.

दिल्लीतील टॉपगन शुटींग अकादमीत (TOPGUN Shooting Academy) सराव करणाऱ्या न्याराचा हा प्रवास अत्यंत वेगाने आणि यशस्वीपणे झाला आहे. तिने जून महिन्यात दिल्ली राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून आपल्या स्पर्धात्मक प्रवासाची सुरुवात केली होती, त्यानंतर जुलैमध्ये देहरादून येथे झालेल्या इंडिया ओपनमध्ये सहभाग घेतला. अवघ्या तिसऱ्याच व्यावसायिक स्पर्धेत तिने राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळवणारी कामगिरी करून दाखवली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे वडील प्रशांत शर्मा यांनी तिच्या कठोर परिश्रमाचे आणि अकादमीच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले आहे.