Junior Womens Asia Cup:चीनविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवत भारत अव्वल स्थानी, आता उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानशी गाठ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
ज्युनियर महिला आशिया कप
ज्युनियर महिला आशिया कप

 

मोकी 

चीनमधील मोकी येथे सुरू असलेल्या ज्युनियर महिला आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताच्या युवा संघाने शानदार कामगिरी करत आपला अंतिम इलाईट पूल सामना चीनविरुद्ध गोलशून्य बरोबरीत सोडवला. या बरोबरीमुळे भारतीय संघाने तीन विजयांच्या आणि एका अनिर्णित सामन्याच्या जोरावर एकूण १० गुणांसह पूल टप्प्यात अपराजित राहत अव्वल स्थान पटकावले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच चीनच्या संघाने आक्रमक पवित्रा घेत भारतीय क्षेत्रात सतत हल्ले चढवले. चीनला पहिल्या सत्रात गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, मात्र भारताची गोलरक्षक निधी हिने पेनल्टी स्ट्रोकवर अप्रतिम बचावात्मक कौशल्य दाखवत चीनचे मनसुबे उधळून लावले. या महत्त्वपूर्ण बचावानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनीही प्रतिस्पर्धी संघावर प्रतिहल्ले सुरू केले.

अटीतटीच्या सामन्यात भारताची उत्कृष्ट बचावात्मक कामगिरी

सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. चीनने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय बचावफळीने अत्यंत शिस्तबद्ध खेळ करत चीनला एकही गोल करू दिला नाही. चौथ्या सत्रातही दोन्ही संघांनी आक्रमक खेळ कायम ठेवला, मात्र कोणालाही भेदकता साधता आली नाही. सरतेशेवटी सामना गोलशून्य संपला, परंतु चांगल्या गोल फरकाच्या आधारे भारतीय संघाने पूलमध्ये पहिले स्थान पटकावले. आता गुरुवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल.