श्रीनगर
जम्मू-काश्मीरची सिनेमॅटिक ओळख केवळ येथील निसर्गरम्य दृश्यांपुरती मर्यादित नसून ती 'कश्मिरियत'च्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये रुजलेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केले. श्रीनगरमधील काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सवाच्या (IFFJK) उद्घात्तन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या प्रदेशाच्या सुवर्णकाळातील सिनेमॅटिक प्रवासाला एक नवीन दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काश्मीर हे अतिशय सुरक्षित, उत्साही आणि चित्रपट युनिट्सचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. येथे उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी काश्मीरचे सदिच्छा राजदूत (ambassadors) बनून उर्वरित जगाला सांगावे की काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात प्रेम म्हणजे काश्मीर हे समीकरण होते, याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.
काश्मीरमध्ये केवळ जुन्या आठवणींवर उद्योग उभा राहू शकत नाही, यासाठी सरकारने एका सर्वसमावेशक 'जम्मू-काश्मीर चित्रपट धोरणा'ची (Film Policy) अंमलबजावणी सुरू केली आहे. याद्वारे सिंगल विंडो क्लिअरन्स, सुलभ परवानगी आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच, भविष्यात पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा, इक्विपमेंट बँक्स आणि चित्रपट प्रशिक्षण संस्थांमध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. काश्मीरमधील स्थानिक तरुणांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून तुमच्या स्वतःच्या कथा जगासमोर आणा, कारण तुमचा आवाज महत्त्वाचा आहे.