मुंबई
बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग सहसा रिॲलिटी टीव्ही शोपासून दूर राहतो. पण त्याचा जुना मित्र आणि प्रसिद्ध गायक काझी तौकीर याच्यासाठी त्याने 'बिग बॉस २०' (Bigg Boss 20) पाहण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत अरिजितने काझीला आपला पाठिंबा दर्शवला असून, त्यांच्या या घट्ट मैत्रीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
अरिजितने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले की, "मला पहिल्यांदाच बिग बॉस पाहावे लागेल, कारण आपला रॉकस्टार काझी तिथे आहे." अरिजितच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अरिजित आणि काझी तौकीर यांची पहिली भेट २००५ मध्ये 'फेम गुरुकुल' या सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये झाली होती. या शोमध्ये काझी आणि रूपरेखा बॅनर्जी यांनी विजेतेपद पटकावले होते, तर अरिजित सिंगने पुढे जाऊन बॉलीवूडचा आघाडीचा गायक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
शो संपल्यानंतर दोघांनीही आपापल्या करिअरमध्ये वेगळे मार्ग निवडले, तरीही त्यांची मैत्री कायम राहिली. या वर्षाच्या सुरुवातीला काझीने अरिजितच्या मूळ गावी, जियागंज येथे भेट दिली होती. त्यावेळी दोघेही स्कूटी चालवताना, क्रिकेट खेळताना आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले होते. आता काझी तौकीर 'बिग बॉस २०' मधून रिॲलिटी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत आहे.
घरात आणि घराबाहेर काझीचा हटके अंदाज आधीच चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच आता अरिजितने दिलेल्या सार्वजनिक पाठिंब्यामुळे काझीच्या खेळात मोठी वाढ होऊ शकते. अरिजितने पहिल्यांदाच बिग बॉस पाहण्याची तयारी दर्शवल्यामुळे, तो 'वीकेंड का वार'मध्ये आपल्या रॉकस्टार मित्राला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.