साकिब सलीम
आज २ ऑक्टोबर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त हा खास लेख. अत्यंत गरिबीतून वर आले आणि आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करता लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान बनले. सत्तेचा गर्व त्यांना कधी शिवलासुद्धा नाही. महात्मा गांधींचे एक वाक्य ते नेहमी सांगायचे, "सत्तेच्या खुर्चीवर बसताना कायम सहज बसा, जास्त घट्ट चिकटून बसू नका."
शास्त्रीजींचे वडील शिक्षक होते. ते अवघ्या दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आई त्यांना प्रेमाने 'नन्हे' म्हणायची. मुघलसराईला आजोबांच्या घरी त्यांचे बालपण गेले. लहानपणी घरात पैशांची जरा चणचण होती. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शास्त्रीजी वाराणशीला गेले. तिथे काही नातेवाईक त्यांच्याकडून घरची कामे करून घ्यायचे अन् त्यांना कधी समानतेची वागणूक द्यायचे नाहीत.
पुढे हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये त्यांना निष्कामेश्वर प्रसाद मिश्रा यांच्यासारखे गुरुजी लाभले. मिश्रा गुरुजींच्या पत्नीने शास्त्रीजींना त्यांच्या मुलांना शिकवल्याबद्दल पैसे देण्याचा प्रयत्न केला. त्यावर शास्त्रीजींनी शांतपणे विचारले, "आपल्याच भावंडांना शिकवण्यासाठी कुणी पैसे घेईल का?"
वयाच्या १६ व्या वर्षी गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या हाकेला प्रतिसाद देत शास्त्रीजींनी थेट परीक्षेचा कागद सोडून दिला अन् आंदोलनात उडी घेतली. गुरुजींनी विचारले, "अरे, आई अन् बहिणींना एकटे सोडून कसा जातोस?" शास्त्रीजींचे उत्तर एकच होते, "हा देशाचा टकार आहे." आईनेही मुलाच्या या निर्णयाला खंबीर साथ दिली, "एकदा पाऊल पुढे टाकलेस, आता कधीही मागे फिरू नकोस!" असा निरोप तिने दिला.
१९२६ मध्ये काशी विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञानात 'शास्त्री' ही पदवी मिळवली. त्यानंतर ते लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या 'सर्व्हंट्स ऑफ द पीपल सोसायटी'चे सदस्य बनले. या संस्थेचे आजीवन सदस्य महिना ६० रुपयांच्या अल्प मानधनावर जगायचे. १९२८ मध्ये त्यांच्या लग्नात त्यांनी हुंडा म्हणून फक्त एक चरखा अन् काही वार खादीचे कापड स्वीकारले.
स्वातंत्र्यसंग्रमात शास्त्रीजींनी तब्बल सात वेळा तुरुंगवास भोगला, आयुष्यभरातली एकूण नऊ वर्षे तुरुंगाच्या चार भिंतींत घालवली. एकदा फैजाबादच्या तुरुंगात भेटायला आलेल्या पत्नीने त्यांच्यासाठी कपड्यांमध्ये लपवून दोन आंबे आणले होते. शास्त्रीजींनी त्यांना या चुकीबद्दल चांगलेच सुनावले, पण नंतर पत्नीचे मन दुखावले म्हणून त्यांची माफीही मागितली.
शास्त्रीजींच्या मुलाला जेव्हा टायफॉइड झाला, तेव्हा त्यांनी राजकारणापासून दूर राहावे असा लेखी करार केला तरच पॅरोल मिळेल, अशी अट प्रशासनाने घातली. शास्त्रीजींनी स्वाभिमानाने ही अट फेटाळली. तरीही त्यांना एका आठवड्याचा पॅरोल मिळाला. आठवडा संपला तरी मुलाची प्रकृती बिघडलेलीच होती, पण दिलेल्या शब्दाला जागून ते वेळेत तुरुंगात परतले.
१९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनात शास्त्रीजी भूमिगत होऊन काम करत होते. अलाहाबादमध्ये (आताचे प्रयागराज) एका बंदी घातलेल्या सभेला संबोधित करताना त्यांना अटक झाली. पती तुरुंगात असताना मुलांचे पोट भरण्यासाठी अन् तुरुंगात भेटायला जाण्याचे भाडे वाचवण्यासाठी त्यांची पत्नी मुलांना भाजलेले गव्हाचे लाडू भरवायची. तिथल्या एका मुस्लिम शेजाऱ्याने त्यांच्या घरासाठी धान्य पुरवले. "लाल बहादूर देशासाठी त्याग करत आहेत, त्यांच्या कुटुंबाला मदत करणे हे आमचे कर्तव्यच आहे," असे तो शेजारी म्हणाला.
राजकीय प्रवासातील तत्त्वनिष्ठा
शास्त्रीजी १९३७ मध्ये यूपी विधानसभेत निवडून आले. जमीन सुधारणा अहवाल तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व त्यांनी केले. १९४५ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर गोविंद वल्लभ पंत यांनी त्यांना लखनौमध्ये आधी संसदीय सचिव अन् नंतर पोलीस व वाहतूक मंत्री केले. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्याऐवजी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करा अन् कमीत कमी बळाचा वापर करा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.
साधेपणा हा शास्त्रीजींच्या नसानसात भिनला होता. जुन्या वर्तमानपत्रावर पराठे अन् भाजी ठेवून ते जेवायचे. एका मित्राने आचारी ठेवण्याचा सल्ला दिला, तेव्हा "त्याचा पगार कुठून देऊ?" असा उलटा प्रश्न त्यांनी विचारला. दुसऱ्या एका प्रसंगी गुरुजींच्या पत्नीने रिकाम्या हाताने आल्याबद्दल विचारले, तेव्हा शास्त्रीजी म्हणाले, "मी मोठा माणूस झालेलो नाही; मला फक्त मोठी कामे करायची आहेत."
१९५१ मध्ये शास्त्रीजी काँग्रेसचे सरचिटणीस झाले अन् १९५२ मध्ये देशाचे रेल्वे मंत्री बनले. त्यांनी तत्कालीन जुनी फर्स्ट क्लास श्रेणी रद्द केली, सेकंड क्लासची सुविधा सुधारली अन् थर्ड क्लासच्या डब्यांत पंखे बसवले. रेल्वे मंत्री असूनही त्यांनी मंत्र्यांसाठी असलेल्या विशेष सलून गाडीतून प्रवास करायला स्पष्ट नकार दिला.
१९५६ मध्ये अरीयालूर रेल्वे अपघातात १४४ लोकांचा जीव गेला. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत शास्त्रीजींनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. जवाहरलाल नेहरूंनी अत्यंत जड अंतःकरणाने त्यांचा राजीनामा मंजूर केला अन् त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
१९६१ ते १९६३ दरम्यान गृहमंत्री असताना त्यांनी सीबीआय (CBI) अन् भ्रष्टाचारविरोधी संथानम आयोगाची स्थापना केली. पुढे कामराज योजनेअंतर्गत त्यांनी मंत्रीपद सोडले. तर १९६४ मध्ये बिनखात्याचे मंत्री म्हणून त्यांना परत बोलावले गेले. त्यावेळी हजरतबल येथील पवित्र अवशेषांच्या संकटाच्या वेळी त्यांनी अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळली.
देशाचे पंतप्रधान पद स्वीकारले
९ जून १९६४ रोजी लाल बहादूर शास्त्री यांची भारताच्या पंतप्रधानपदी एकमुखाने निवड झाली. पंतप्रधान झाल्यावरही त्यांच्या घरात तेच जुने, जाडेभरडे कपडे वापरले जायचे. कॉलर अन् बाह्या झिजलेले कुर्ते ते कोटच्या आत घालायचे. आपल्या पगारातील एक हिस्सा ते नियमितपणे 'सर्व्हंट्स ऑफ द पीपल सोसायटी'ला दान करायचे.
पंतप्रधानांसाठी असलेली आलिशान इम्पाला गाडी फक्त परदेशी पाहुण्यांसाठी राखीव असायची. एकदा त्यांच्या मुलांनी ती गाडी वापरली. शास्त्रीजींना हे कळताच त्यांनी चालकाला बोलावून लॉगबुकमध्ये "१४ किलोमीटर, खाजगी वापर" अशी नोंद करायला लावली अन् स्वतःच्या खिशातून प्रति किलोमीटर सात पैसे दराने पैसे सरकारी तिजोरीत जमा केले.
शास्त्रीजींचे निधन झाले तेव्हा त्यांच्या नावावर कोणतीही शिल्लक बचत नव्हती. हप्त्यावर घेतलेल्या एका छोट्या गाडीचे हप्ते त्यांच्या निधनानंतर तीन वर्षे फेडले जात होते. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य अन् रोजगार देऊन स्वयंपूर्ण करणे अन् श्रीमंत-गरीब यांमधील दरी कमी करणे, हीच शास्त्रीजींच्या दृष्टीने समाजवादाची खरी व्याख्या होती.
त्या काळात देशात अन्नाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता, १८ महिन्यांत अन्नाचे भाव २२ टक्क्यांनी वाढले होते. अन्न अन् संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर देशाने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यावर त्यांचा भर होता. याच विचारातून त्यांची प्रसिद्ध घोषणा जन्माला आली ती म्हणजे "जय जवान, जय किसान."
त्यांनी देशवासियांना महिन्यातून एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले. मंत्र्यांना साधेपणा पाळण्यास सांगितले अन् स्वतःच्या निवासस्थानासाठी नवीन फर्निचर खरेदी करण्यास सक्त मनाई केली.
१९६५ च्या युद्धादरम्यान शास्त्रीजींनी आपल्या मुलाला सांगितले की, ही लढाई दोन सरकारांमध्ये आहे, दोन देशांच्या लोकांमध्ये नाही; त्यामुळे सामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी भारताचे खंबीर नेतृत्व केले.
१० जानेवारी १९६६ रोजी झालेल्या ताश्कंद करारावर भारत अन् पाकिस्तानने स्वाक्षऱ्या केल्या. सर्व वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. दुर्दैवाने, त्याच रात्रीनंतरच्या पहाटे शास्त्रीजींचे निधन झाले.
निधनापूर्वी शास्त्रीजी एका कागदावर उर्दूतील ही ओळ खरडत होते,
बडे शौक से सुन रहा था जमाना
हम ही सो गये दास्तां कहते कहते...
(संपूर्ण जग अत्यंत उत्सुकतेने ऐकत होते; आणि कथा सांगता सांगता मीच निजलो...)