अब्दुलकादिर इंदूरवाला : २३ सुवर्णपदके जिंकणारा पॅरा स्विमर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अब्दुलकादिर इंदूरवाला
अब्दुलकादिर इंदूरवाला

 

मन्सूरउद्दीन फरीदी

जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर शरीराचं कोणतंही अपंगत्व तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही. ही गोष्ट १०० टक्के खरी ठरवून दाखवलीये अब्दुलकादिर इंदूरवाला याने! दोन्ही हात नसलेला हा जिद्दी पॅरा-स्विमर याच महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या 'पॅरा एशियन गेम्स २०२६' मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायला सज्ज झालाय. जपानच्या आयची प्रांतातील नागोया शहरात १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा रंगणार आहेत. जगातील ४५ देशांमधील तब्बल ३,६०० ते ४,००० खेळाडू या पदकांच्या शर्यतीत उतरणार आहेत.

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी एका भयानक विजेच्या धक्क्याने अब्दुलकादिरचे दोन्ही हात हिरावून घेतले. एवढं मोठं वादळ आयुष्यात येऊनही तो खचला नाही. नियतीने दिलेल्या या दुःखाशी त्याने हळूहळू जुळवून घेतलं. पुढे पोहण्याच्या तलावात उतरून त्याने राष्ट्रीय स्तरावर तब्बल २३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांची कमाई केली!

सध्या अब्दुलकादिर अहमदाबाद येथील 'स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या केंद्रात तासनतास कसून सराव करतोय. दाऊदी बोहरा समुदायाचा असलेला अब्दुलकादिर 'आवाज-द व्हॉईस'शी बोलताना सांगतो, "माझ्या सकारात्मक विचारसरणीनेच मला निराशेच्या गर्तेत बुडण्यापासून वाचवलं. कधीही हार न मानण्याच्या माझ्या सवयीने आयुष्याला एक नवीन दिशा दिली."

हात नसताना एकेकाळी अत्यंत कठीण वाटणारं आयुष्य आज त्याच्यासाठी अगदी सामान्य बनलंय.
पोहण्याच्या तलावात जिंकलेली जिंदगी
मध्य प्रदेशातील रतलाम शहरात लहानाचा मोठा झालेला अब्दुलकादिर! त्याच्यासाठी स्विमिंग पूल हा केवळ पोहण्याची जागा नव्हती, तर आयुष्याशी दोन हात करण्याचं मैदान होतं. धैर्य, जिद्द, आवड आणि प्रचंड कष्टाच्या जोरावर त्याने अपंगत्वाच्या सर्व सीमा पार केल्या.

अब्दुलकादिरच्या या संघर्षात आणि यशात त्याचे वडील हुसेन इंदूरवाला यांची भूमिका सर्वात महत्त्वाची राहिली. मुलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो निराशेच्या गर्तेत अडकणार नाही, याची काळजी त्यांनी पावलोपावली घेतली.

तो दुर्दैवी अपघात 
त्या भयानक घटनेची आठवण सांगताना अब्दुलकादिर म्हणाला, "२०१४ मध्ये भोपाळमधील आजोबांच्या घरी खेळताना मला १०,००० व्हॉल्टचा प्रचंड विजेचा धक्का बसला." या अपघातात त्याचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले. इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरू नये म्हणून डॉक्टरांना त्याचे दोन्ही हात कोपरापासून कापावे लागले.

त्या वेळी तो अवघ्या सात वर्षांचा होता. चिमुकल्या आयुष्याभोवती अंधाराचा वेढा पडला होता. निराशा मनात घर करू पाहत होती. पण अशा कठीण प्रसंगी कुटुंबाने दिलेल्या धीराने आणि प्रेमाने या अंधाराचे रुपांतर प्रकाशात केले.

पायाने लिहायला शिकलेला जिद्दी मुलगा
अपघातानंतर रोजची साधी कामं नव्याने शिकणं हे चिमुकल्या अब्दुलकादिरसाठी सर्वात मोठं आव्हान होतं. त्यातही शिक्षणासाठी लिहिणं खूप गरजेचं होतं. मग काय, त्याने थेट पायाने लिहिण्याचा सराव सुरू केला.

सततच्या प्रयत्नांनंतर अवघ्या सहा महिन्यांत तो पायाने पटापट लिहायला शिकला. अब्दुलकादिरचे वडील हुसेन इंदूरवाला यांनी 'आवाज-द व्हॉईस'शी बोलताना सांगितले की, त्यांनी मुलाला कधीही कमीपणा किंवा लाचार वाटू न देण्याची शपथच घेतली होती. कोणी दया दाखवून बोलू लागलं की ते लगेच त्याला सुनावत असत.

वडिलांचा हाच दृष्टिकोन अब्दुलकादिरची सर्वात मोठी ताकद बनला. तो सांगतो, "मी कधीच घाबरलो नाही. मी आयुष्यात काहीही करू शकतो, या आई-वडिलांच्या विश्वासाने मला बळ दिले."

संकटाच्या काळात मिळालेली साथ
हुसेन रतलाम शहरात पेंट आणि हार्डवेअरचा व्यवसाय करतात. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांचे कुटुंब तिथे राहते. अपघातानंतर मुलाचे आयुष्य संपले असेच त्यांना वाटले होते.

पण या कठीण काळात हे कुटुंब एकटं नव्हतं. मित्र, शेजारी आणि शाळेच्या प्रशासनाने हुसेन यांच्या कुटुंबाला खूप धीर दिला. अब्दुलकादिरच्या शिक्षणात आणि पोहण्याच्या प्रवासात सर्वांनी मोलाची साथ दिली.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी तर थेट घरी येऊन त्याच्या पालकांना आश्वस्त केले, "अब्दुलकादिरच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शाळा घेईल. तो १२ वीपर्यंतचे शिक्षण सहज पूर्ण करेल."

सोशल मीडिया अन् पोहण्याची नवी वाट
त्याच काळात कुटुंबाच्या वाचनात आणि पाहण्यात सोशल मीडियावरील पॅरा-स्पोर्ट्सचे फोटो आले. अपंगत्व असलेले लहान मुलं-मुली पदके जिंकताना पाहून हुसेन यांच्या मनात आशेचा किरण जागा झाला. आपल्या मुलासाठीही एक नवीन वाट निर्माण होऊ शकते, असा विश्वास त्यांना वाटला.

तिथूनच अब्दुलकादिरला पोहण्याच्या विश्वात आणण्याचा निर्णय झाला. पोहण्याच्या तलावात उतरताच त्याने स्वतःची क्षमता दाखवायला सुरुवात केली.

या नव्या सुरुवातीमागे आणखी एका व्यक्तीचा मोठा हात होता, ते म्हणजे त्याचे कोच राजा राठोड! त्यांनी अब्दुलकादिरला पोहण्याचे धडे देण्याची जबाबदारी घेतली.

कोच राजा राठोड यांची मोफत साथ
सुरुवातीला शरीराची हालचाल सुधारावी आणि रिकव्हरी व्हावी याच उद्देशाने तो पोहायला शिकत होता. पण लवकरच कोच आणि पालकांच्या लक्षात आले की या मुलामध्ये अफाट गुणवत्ता आहे.

कोच राजा राठोड यांनी अब्दुलकादिरकडून एक रुपयाही न घेता त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आजतागायत ते त्याला मोफतच ट्रेनिंग देत आहेत.

अब्दुलकादिरने आपली सर्व शक्ती पोहण्यावर केंद्रित केली. हात नसताना पाण्यात शरीराचा समतोल राखणे, श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे आणि वेगाने पोहणे हे मोठे आव्हान होते. पण अवघ्या एका वर्षाच्या आत या तरुण पॅरा-स्विमरने बेळगाव येथील पॅरा नॅशनल गेम्समध्ये पदकांची कमाई करून सर्वांना थक्क केले!

जागतिक व्यासपीठावर भारताचा डंका
इजिप्तमध्ये २०२४ मध्ये झालेल्या 'सिटी पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज'मध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. ५० मीटर बॅकस्ट्रॉकमध्ये सुवर्ण आणि ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य पदक पटकावून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकावला.

दुबईत झालेल्या 'आशियन यूथ पॅरा गेम्स २०२५' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना त्याने ३ सुवर्ण आणि १ कांस्य पदक जिंकले. याशिवाय 'वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५' मध्ये जगातील सर्वोत्तम पॅरा-स्विमर्सशी दोन हात करत त्याने आपली क्षमता सिद्ध केली.

ध्येय आता पॅरालिम्पिक!
दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो पोहण्याच्या तलावात तासनतास घाम गाळतो. अब्दुलकादिर म्हणतो, "माझा प्रवास तर नुकताच सुरू झालाय. माझी खरी नजर आता 'पॅरालिम्पिक खेळां'वर आहे!"

त्याचे वडील हुसेन सांगतात की, मुलाचे यश हे नक्कीच त्याच्या संघर्षाचे फळ आहे, पण त्यासोबतच अनेक लोकांचे आशीर्वाद आणि साथही त्याला लाभली आहे.

दाऊदी बोहरा समुदायाचे आध्यात्मिक प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचा विशेष आशीर्वाद अब्दुलकादिरला मिळाला आहे. तसेच त्याच्या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्चही हा समुदाय उचलत आहे.

शिक्षणातही पुढे अन् विचारही पक्के!
सध्या अब्दुलकादिर बीबीए (BBA) च्या दुसऱ्या वर्षात शिकतोय. 'आवाज-द व्हॉईस'शी बोलताना तो अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतो, "कोणतंही अपंगत्व तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही. माणसाने कधीही हार मानू नये. सतत कष्ट करत राहणं हीच आपली पहिली पसंती असायला हवी. शिस्त हा आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे, तिच्याशिवाय आयुष्य अपूर्णच राहतं."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter