पंजाबमध्ये सीमापार शस्त्र तस्करीचा पर्दाफाश; अमृतसरमध्ये AK-47 आणि दोन हँड ग्रेनेड हस्तगत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

अमृतसर 

पंजाबमधील अमृतसर येथे पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय शस्त्र आणि स्फोटके पुरवठा करणाऱ्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका २८ वर्षीय चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक AK-47 रायफल, ९ जिवंत काडतुसे आणि दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. परदेशी तस्करांच्या इशाऱ्यावर ही शस्त्रे पुरवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

अमृतसर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

अमृतसर ग्रामीण पोलिसांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. तार्ण तारण जिल्ह्यातील रहिवासी असलेला नवज्योत सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस तपासात उघड झाले की, तो ट्रक चालक असून परदेशी तस्करांच्या संपर्कात होता आणि त्यांच्या सूचनेनुसार अवैध शस्त्रे गोळा करत करत होता. पोलिसांनी शस्त्रे वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे.

परदेशी तस्करांशी संबंध उघड

पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवज्योत सिंगचे परदेशी तस्करांसोबत संबंध असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीमापार होणाऱ्या या बेकायदेशीर शस्त्र तस्करीच्या रॅकेटचे इतर धागेदोरे शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. सीमावर्ती भागात बेकायदेशीर शस्त्र तस्करी करणाऱ्या आणि संघटित गुन्हेगारी नेटवर्कविरुद्ध कठोर मोहीम राबवण्यात येत आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

घरिंडा पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या नेटवर्कमधील इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.