नवी दिल्ली
अभिनेता विजय देवरकोंडा याने ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा: पार्ट १' या चित्रपटातील 'चुट्टामल्ले' गाण्याच्या एआय-जनरेटेड (AI) डीपफेक व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ जान्हवी कपूरच्या प्रतिमेत छेडछाड करून अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने बनवण्यात आला होता, जो आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर आपली प्रतिक्रिया देताना विजय देवरकोंडाने अशा कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. "आपण इतके असंवेदनशील कसे झालो? एकमेकांना खाली खेचण्यात आपल्याला आनंद कसा मिळतो? एकीकडे जग एआयमुळे नोकऱ्या जाण्याच्या चिंतेत असताना, काही मुर्ख लोक याच तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत चुकीचे कृत्य करत आहेत. हा डिजिटल स्वरूपातील लैंगिक अत्याचार आहे. कायद्याने अशा कृत्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे," असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी ज्युनियर एनटीआरनेही या व्हिडिओचा तीव्र निषेध करत त्याला "अत्यंत लाजीरवाणे" म्हटले होते. महिलांचा अनादर करणाऱ्या अशा लोकांविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी एआयच्या गैरवापरा विरोधात कडक नियमावली आणावी, अशी मागणीही त्याने केली होती. रश्मिका मंदाना, कट्रिना कैफ, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांसारख्या अनेक सेलिब्रिटींना याआधी डीपफेकचा फटका बसला असून, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या मजकुरावर वाढती चिंता व्यक्त होत आहे.