गुवाहाटी
आसाममधील गुवाहाटी येथे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी (PIO) संबंध असल्याच्या व हेरगिरी केल्याच्या संशयावरून एका माजी जवानासह दोघांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या गुप्त माहितीच्या आधारे आसाम पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपी सैन्याच्या हालचालींची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा संशय आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत या अटकेची पुष्टी केली. ते म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या इनपुटच्या आधारे आसाम पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण माजी लष्करी जवान असून सध्या तो करारावर (contractual basis) सैन्यात काम करत होता. हे दोघे पाकिस्तानच्या संपर्कात होते आणि लष्कराच्या हालचालींची माहिती पुरवत होते, असा संशय आहे.
आसाम पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, ३१ वर्षीय अभिषेक कुमार सिंग असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तो बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्याचा रहिवासी आहे. गुवाहाटीच्या सातगाव परिसरातील एका भाड्याच्या घरातून आसाम पोलिसांच्या विशेष पथकाने (STF) त्याला अटक केली आहे. तेजपूर येथील गजराज एमआयच्या प्राथमिक इनपुटच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आयजीपी पार्थ सारथी महंता आणि एसएसपी तरुण पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान पोलिसांनी अभिषेक सिंगच्या ताब्यातून एक मोबाईल फोन, सिम कार्ड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत.
प्राथमिक तपासात आरोपी सुरक्षा दलांशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तहेरांना (PIO) पुरवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, या नेटवर्कशी जोडलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.