नौदलाचा कडक गणवेश आणि मनात संवेदनशील शायर; खुर्रम शहजाद नूर यांचा प्रेरणादायी प्रवास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 8 h ago
रिअर ॲडमिरल (निवृत्त) खुर्रम शहजाद नूर
रिअर ॲडमिरल (निवृत्त) खुर्रम शहजाद नूर

 

अर्सला खान, नवी दिल्ली

अथांग समुद्रात देशाच्या सीमेचं रक्षण करणं आणि मैफिलीत शब्दांच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाला स्पर्श करणं, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. पण काही लोक आपलं आयुष्य एकाच चौकटीत बांधून ठेवत नाहीत. ते प्रत्येक आव्हान पार करून नवा इतिहास रचतात. आपण रिअर ॲडमिरल (निवृत्त) खुर्रम शहजाद नूर यांच्याबद्दल बोलतोय. भारतीय नौदलाच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याचा कितीतरी काळ समुद्राच्या लाटांवर घालवला. पण त्यांच्या आत शायरही जिवंत होता. या शायरने लष्करी शिस्त आणि साहित्यिक संवेदनशीलतेचा अनोखा संगम सर्वांसमोर मांडला.

प्रत्येक यशस्वी कथेमागे काही अव्यक्त संघर्ष लपलेले असतात. खुर्रम शहजाद नूर यांचं आयुष्यही काहीसं असंच आहे. त्यांचं मूळ कुटुंब उत्तर प्रदेशातल्या बिजनौर जिल्ह्यातल्या नगीना इथलं आहे. त्यांचे वडील तिथे इंटर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक होते. पण त्यांच्या आयुष्याची सुरुवात सोपी नव्हती. ते प्री-मॅच्युअर बाळ होते आणि अवघ्या सातव्या महिन्यातच त्यांचा जन्म झाला होता.

बालपणी त्यांचं शरीर कमकुवत होतं. इतर मुलांप्रमाणे त्यांच्यासाठी सामान्य शारीरिक हालचाली करणंही सोपं नव्हतं. त्यांनी 'आवाज द व्हॉईस'शी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली. "मी माझ्या भावाच्या तुलनेत उशिरा चालायला शिकलो. शाळेच्या मैदानात फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करताना मी थोडं पळाल्यावरच धाप लागायची," असं ते म्हणाले. हा कमकुवत मुलगा पुढे जाऊन भारतीय नौदलाच्या कठीण जबाबदाऱ्या सांभाळेल, असा विचार त्यावेळी कदाचित कोणीच केला नसेल. पण त्यांनी स्वतःच्या शारीरिक कमकुवतपणाला वाटेतला अडथळा होऊन दिला नाही.

पत्नी आरती यांच्यासोबतचा सुंदर किस्सा

आयुष्यातले काही योगायोग इतके सुंदर असतात, ते कायमची आठवण बनून राहतात. खुर्रम शहजाद नूर यांच्या आयुष्यातला असाच वैयक्तिक आणि रंजक पैलू त्यांच्या पत्नी आरती यांच्याशी जोडलेला आहे. 'आवाज द व्हॉईस'च्या टीमशी संवाद साधताना त्यांनी हा सुंदर किस्सा सर्वांना सांगितला.

त्या काळात त्यांच्या पत्नीच्या घरी येणाऱ्या वर्तमानपत्रातच खुर्रम साहेबांच्या कविता आणि जाहिराती छापून यायच्या. म्हणजेच त्यांचे शब्द पत्नीच्या घरापर्यंत पोहोचवणारं वर्तमानपत्रच त्यांच्या आयुष्यातल्या प्रेमकहाणीचा महत्त्वाचा भाग बनलं. नौदलाच्या गंभीर आणि शिस्तबद्ध जीवनात नात्यांमधली ही उबदारता त्यांच्या प्रवासाला मानवी बनवते. खुर्रम साहेब आणि त्यांची पत्नी दोघेही मांसाहार करत नसत. याच विशेष गोष्टीमुळे हे नातं अधिकच घट्ट झालं.

नौदलाचा गणवेश आणि तांत्रिक प्रभुत्व

काळाच्या ओघात त्यांनी स्वतःचं शिक्षण आणि कठोर मेहनतीच्या जोरावर भारतीय नौदलाचा मार्ग निवडला. त्यांनी सुमारे ३५ वर्षं देशाची सेवा केली. नौदलात त्यांचं मुख्य काम तंत्रज्ञान आणि शिक्षणाशी जोडलेलं होतं. ते अँटी-सबमरीन वॉरफेअरचे तज्ज्ञ राहिले आहेत. समुद्राच्या आत शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणं आणि त्यांचा सामना करणं, असा याचा सोपा अर्थ होतो.

त्यांनी वेलिंग्टन इथल्या प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून प्रशिक्षणही घेतलं होतं. त्यांच्या कौशल्याचा महत्त्वाचा भाग 'सोनार' तंत्रज्ञान होता. समुद्राच्या आत ध्वनी लहरींच्या मदतीने पाणबुड्यांचा अचूक शोध घेणारं हे गुंतागुंतीचं तंत्रज्ञान आहे. सामान्य लोकांसाठी हे तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगण्यात ते पटाईत होते. आकाशवाणी आणि विविध संरक्षण मंचांवर त्यांनी याबद्दल मनमोकळेपणाने माहिती दिली. पदोन्नती मिळवत ते भारतीय नौदलात रिअर ॲडमिरल या पदापर्यंत पोहोचले. नौदलातल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना 'राजीव गांधी सद्भावना पुरस्कार' देऊनही सन्मानित करण्यात आलं होतं.

गणवेशामागे लपलेला संवेदनशील शायर

नौदलाचं आयुष्य पूर्णपणे शिस्त आणि कठोर निर्णयांवर आधारलेलं असतं. पण त्या कडक गणवेशामागे संवेदनशील शायरही दडलेला होता. ते जेव्हा एखाद्या मुशायऱ्याच्या मंचावर येतात, तेव्हा सर्व वातावरण बदलतं. समुद्राची रणनीती आणि पाणबुड्यांची चर्चा करणारी ही व्यक्ती अचानक शब्द आणि भावनांच्या वेगळ्याच जगात उतरते. त्यांच्या शायरीमध्ये आयुष्य, नाती, प्रेम आणि माणुसकीचा खोल ठसा दिसून येतो. त्यांच्या रचना गुंतागुंतीच्या किंवा कठीण नसतात. त्या थेट माणसाच्या हृदयाला स्पर्श करतात. नात्यांमधली गुंतागुंत व्यक्त करणारी त्यांची 'रिश्तों की डोर' ही रचना लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आयुष्यातल्या अडचणींनंतरही नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे, हा त्यांच्या शायरीचा मुख्य संदेश असतो.

हेही वाचा: पायांनी लिहून बारावीत जिल्ह्यात पहिली आलेली जुहा बनू पाहतेय न्यायाधीश!

लघुपट आणि अंतर्मनाचा प्रवास

खुर्रम शहजाद नूर उत्तम लघुपटही बनवतात. या चित्रपटांच्या माध्यमातून ते सामाजिक प्रश्न आणि मानवी नात्यांची गुंतागुंत पडद्यावर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. 'अंतर्मन' सारख्या त्यांच्या कलाकृती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळाच पैलू समोर आणतात. यात लष्करी अधिकारी स्वतःच्या आत दडलेल्या भावनांचा खोलवर शोध घेतो. हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. संरक्षण मंत्रालय आणि नौदलाच्या राजभाषा कार्यक्रमांमध्ये त्यांना अनेकदा अतिथी वक्ता म्हणून आवर्जून बोलावलं जातं. लष्करी शिस्त आणि साहित्यावरचं प्रेम हे परस्पर विरोधी नाही. ते एकमेकांना उत्तमरीत्या पूरक ठरू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलंय.

या कमकुवतपणामुळे खुर्रम यांना लष्करात जायचं नव्हतं

खुर्रम शहजाद नूर बालपणी स्वतःच्या शारीरिक कमकुवतपणामुळे सैन्यात जाण्याचा विचार करत नसत. त्यांचा जन्म सातव्या महिन्यातच झाला होता आणि बालपणी ते कमकुवत होते. खुर्रम भौतिकशास्त्राच्या तासाला जायचे, तेव्हाची ही गोष्ट आहे. तिथे त्यांना कर्नल भेटले. "तू तर लष्करासाठीच बनला आहेस, तू नक्की तिथे गेलं पाहिजेस," असं ते कर्नल खुर्रम यांना म्हणाले. त्यानंतर खुर्रम यांच्या मनात लष्करात जाण्याचा विचार आला. शाळेत असताना थोडं पळाल्यावरही ते लवकर थकायचे आणि त्यांना धाप लागायची. याच गोष्टीमुळे आपण कधीतरी सशस्त्र दलांचा भाग बनू शकू, असा विश्वास त्यावेळी कदाचित त्यांना स्वतःलाही नसेल. पण पुढे जाऊन त्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना मागे टाकलं. भारतीय नौदलात सामील होऊन ते रिअर ॲडमिरल या पदापर्यंत पोहोचले.

एक आयुष्य आणि अनेक ओळखी

रिअर ॲडमिरल खुर्रम शहजाद नूर (निवृत्त) यांचा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणा आहे. कमकुवत जन्मलेलं बाळ पुढे जाऊन देशाच्या सर्वोच्च लष्करी पदापर्यंत पोहोचलं. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी स्वतःची कला आणि साहित्याच्या माध्यमातून समाजाशी आपलं घट्ट नातं टिकवून ठेवलं. माणसाची ओळख कोणत्याही एका चौकटीत बांधलेली राहत नाही. माणसाचे हेतू आणि इरादे पक्के असतील, तर तो एकाच आयुष्यात अनेक वेगवेगळ्या भूमिका निष्ठेने जगू शकतो, हेच त्यांनी दाखवून दिलं आहे.