नवी दिल्ली
भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उभा राहिला असून, कॅनेडियन गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणुकीच्या अपवादात्मक आणि भक्कम संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. टोरंटो येथे कॅनडातील प्रमुख व्यावसायिक आणि उद्योग समुदायाला संबोधित करताना त्यांनी भारताच्या आर्थिक विकासाचा सविस्तर आढावा घेतला.
दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कॅनेडियन गुंतवणूकदारांसाठी भारतामध्ये प्रचंड वाव असल्याचे सांगत सीतारामन म्हणाल्या की, भारताचा विकास हा मोठ्या प्रमाणावर, सातत्यपूर्ण, तरुणांची वाढती लोकसंख्या, वाढता उपभोग आणि वेगाने प्रगत होणाऱ्या भांडवली बाजारावर आधारित आहे. जलद शहरीकरण, वाढता मध्यमवर्ग आणि जागतिक दर्जाची डिजिटल पायाभूत सुविधा यामुळे देशातील प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि युपीआय (UPI) व्यवहारांची जागतिक पातळीवरील सुलभता यावरही त्यांनी विशेष भर दिला. कॅनेडियन बँका आणि फिनटेक कंपन्यांसोबत सहकार्याच्या अथांग संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही काळांत भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये सकारात्मक बदल झाला असून, लोकशाही मूल्ये आणि सांस्कृतिक ओळखीमुळे हा प्रवास अधिक मजबूत झाला आहे. कॅनडामधील भारतीय डायस्पोरा हा दोन्ही देशांमधील एक मोलाचा दुवा असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील चर्चेचा संदर्भ देत, दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार २०२३ पर्यंत ७० अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवल्याचे वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले.