ओडिशा
ओडिशातील प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट झाली असली, तरी राज्यातील पूरपरिस्थिती अद्यापही गंभीर कायम आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांतील एक लाखांहून अधिक नागरिक अद्यापही पुरामुळे प्रभावित झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. पूरग्रस्त भागांत मदत आणि बचावासाठी एकूण ७९ पथके दिवसरात्र कार्यरत आहेत.
भद्रक जिल्ह्यातील तिहिडी आणि चांदबाली ब्लॉकच्या १८ ग्रामपंचायतींमधील ७० गावांमधील ७५,४३२ नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत. याशिवाय, जाजपूर जिल्ह्यातील बिंझारपूर आणि दाशरथपूर ब्लॉकमधील ४१ गावांमधील २१ हजारांहून अधिक लोकांनाही पुराचा फटका बसला आहे. केंद्रपाडा जिल्ह्यातील पाच ब्लॉक आणि एका शहरी भागातील ५ हजारांहून अधिक नागरिक अजूनही बाधित आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे केओंझर, नबरंगपूर आणि कोरापुट जिल्ह्यांचे काही भागही प्रभावित झाले आहेत. प्रशासनाने नबरंगपूरमधून १,६२२ आणि कोरापुटमधून ६६० लोकांना सुरक्षित स्थलांतरित करून मदत शिबिरांमध्ये आश्रय दिला आहे.
महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, प्रभावित भागात तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी ओडिशा अपत्ती जलद कृती दलाच्या (ODRAF) २८, राष्ट्रीय आपत्ती दल (NDRF) ची १ आणि अग्निशामक दलाच्या ५० पथकांसह एकूण ७९ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. वैतरणी, जलका, वंसधारा, ब्राह्मण आणि सुवर्णरेखा यांसारख्या प्रमुख नद्या सध्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत, ज्यामुळे पूरस्थितीत सुधारणा होण्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे अभियंता-प्रमुख दिलीप कुमार राऊत यांनी वर्तवला आहे.
मात्र, पाणी पूर्णपणे ओसरले नसल्याने अनेक गावे अद्यापही पाण्याखाली आहेत. हीराकुड धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे बुधवारपासून महानदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा अंदाज आहे. कटक जिल्ह्यातील मुंडली येथे पाण्याचा प्रवाह ६ लाख क्युसेक्सवरून ६.७ लाख क्युसेक्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, परंतु यामुळे मोठा पुराचा धोका संभवत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हवामान खात्याने बुधवारसाठी ओडिशातील पावसाचा कोणताही इशारा जारी केलेला नाही.