डॉ. फिरदौस खान
भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि रामनवमीप्रमाणेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा वाढदिवस श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अढळ श्रद्धा असणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा सण आहे. इस्लामी दिनदर्शिकेच्या तिसऱ्या महिन्यातल्या म्हणजेच रबी-उल-अव्वलच्या बाराव्या तारखेला ईद मिलाद-उन-नबी म्हणून हा सण सर्वत्र साजरा होतो. या रात्री आकाशात चंद्रही सुंदरपणे हसत असतो. ही उजळलेली पौर्णिमेची रात्र असते.
ईद मिलाद-उन-नबीच्या आधी लोक स्वतःच्या घरांची उत्तम साफसफाई करतात. मशिदी, दर्गे आणि मुस्लिम परिसरांना रंगीबेरंगी दिवे, पताका आणि झेंड्यांनी सुंदर सजवलं जातं. रात्री मशिदी, दर्गे आणि घरांमध्ये रोषणाई केली जाते. काही लोक मेणबत्त्या लावून आपलं घर उजळून टाकतात. तर काही लोक विजेच्या दिव्यांच्या माळा लावून आनंद साजरा करतात.

अनेक घरांमध्ये, मशिदींमध्ये आणि खानकाहांमध्ये मिलाद आणि नात पठण होतं. आका हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं जीवन आणि त्यांच्या मोलाच्या शिकवणुकीचा यावेळी आवर्जून उल्लेख केला जातो. अनेक ठिकाणी रबी-उल-अव्वलचा चंद्र दिसल्याबरोबर मिलाद शरीफच्या पर्वाची सुरुवात होते. या संपूर्ण काळात मिलाद, दरूद आणि सलाम श्रद्धेने वाचला जातो.
ईद मिलाद-उन-नबीच्या दिवशी मश्जिदींमध्ये सकाळी फजरच्या नमाजनंतर समृद्धी, शांतता आणि सलोख्यासाठी प्रार्थना केल्या जातात. या दिवशी लोक प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पवित्र खुणांचे दर्शन घ्यायलाही आवर्जून जातात.
या पवित्र खुणांना तबर्रुकात असं म्हटलं जातं. देशाच्या कानाकोपऱ्यात त्या आदराने आणि सुरक्षितपणे ठेवलेल्या आहेत. यात प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या दाढीचे पवित्र केस, नक़्शे-दस्त म्हणजेच हाताचे ठसे असलेले दगड, नक़्शे-पा म्हणजेच पावलांचे ठसे असलेले दगड, नालैन आणि जुब्बा शरीफ यांचा समावेश आहे.
श्रीनगरमधल्या दल सरोवराच्या काठावर असलेल्या हजरत बल दर्ग्यात प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या दाढीचा पवित्र केस सुरक्षित ठेवलेला आहे. याला मू-ए-मुकद्दस, मू-ए-पाक आणि मू-ए-मुबारक असंही म्हटलं जातं. विशेष प्रसंगी भाविकांना त्याचं दर्शन घडवलं जातं.

उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या अनेक खुणा श्रद्धेने जतन केलेल्या आहेत. एटा जिल्ह्यातल्या मारहरा इथल्या खानकाह-ए-बरकातियामध्येही हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या अनेक खुणा ठेवलेल्या आहेत. यात प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या दाढीचा पवित्र केस, पावलांचा ठसा आणि नालैन यांचा समावेश आहे. या पवित्र खुणा आखाती देशांमधून प्रवास करत सतराव्या शतकात हजरत सय्यद शाह हमजा ऐनी रहमतुल्लाह अलैह यांच्यापर्यंत पोहोचल्या, असं अभिमानाने सांगितलं जातं.
कन्नौज जिल्ह्यातल्या गुरसहायगंज इथल्या मदरसा मजहरुल उलूममध्ये हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या दाढीचा पवित्र केस ठेवलेला आहे. हा केस काचेच्या शोकेसमध्ये आदराने जतन करण्यात आलाय.
बहराइचमधल्या सय्यद सालार मसूद गाझी रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्गा परिसरातही हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पवित्र खुणा सुरक्षित ठेवलेल्या आहेत. दर्गा परिसरातल्या रसूल हुजरा इथे प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे हात आणि पावलांचे ठसे असलेला ऐतिहासिक दगड ठेवलेला आहे.
बादशाह फिरोजशाह तुघलक याने अरबस्तानातून हा दगड मागवला होता, असा इतिहास सांगितला जातो. बादशहाने इथली इमारतही बांधली होती. फर्रुखाबाद जिल्ह्यातल्या शेखपूर गावातल्या हजरत शेख मखदूम बुर्राक लंगर जहाँ रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्ग्यातही हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या दोन महत्त्वाच्या खुणा ठेवलेल्या आहेत.

यात प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पावलांचे पवित्र ठसे आणि जुब्बा शरीफ यांचा समावेश आहे. कानपूर देहातच्या बारा गावातल्या तकिया दर्ग्यात दगडावर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पावलांचे पवित्र ठसे उमटलेले आहेत.
भारतातल्या विविध सणांच्या मिरवणुकांप्रमाणेच ईद मिलाद-उन-नबीच्या दिवशीही भव्य मिरवणुका काढल्या जातात. देशाची राजधानी दिल्लीसह विविध शहरांमध्ये निघणाऱ्या या मिरवणुकांमध्ये तिथल्या स्थानिक संस्कृती आणि स्थानिक परंपरांची झलक पाहायला मिळते. मिरवणुकीत सहभागी झालेले लोक हातात हिरवे झेंडे घेऊन "लब्बैक या रसूल अल्लाह" अशा घोषणा देतात. यात मुस्लिमांसोबतच इतर धर्मांचे लोकही उत्साहाने सहभागी होतात.
लखनौमधली ईद मिलाद-उन-नबीची मिरवणूक तिथली अवधी संस्कृती आणि आदरासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे शिया आणि सुन्नी या दोन्ही समुदायांच्या अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे. मिरवणुकीदरम्यान दरूद आणि नात शरीफ वाचली जाते. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून मिरवणुकीचं भव्य स्वागत केलं जातं. स्वागत करणाऱ्यांमध्ये मुस्लिमांव्यतिरिक्त स्थानिक हिंदू व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांचाही आवर्जून समावेश असतो.
त्याचप्रमाणे हैदराबादची ईद मिलाद-उन-नबीची मिरवणूकही तिथल्या दख्खनी संस्कृती आणि स्थानिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. मिरवणुकीत सहभागी झालेले लोक पारंपारिक हैदराबादी शेरवानी, कुर्ता-पायजमा आणि हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचा फेटा परिधान करतात. या दिवशी जुन्या हैदराबादमध्ये आणि विशेषतः चारमिनारच्या आजूबाजूला असलेली गर्दी आणि आनंद पाहण्यासारखा असतो.
मुंबईत निघणाऱ्या मिरवणुकीत पारंपारिक आणि आधुनिकतेचा सुंदर रंग पाहायला मिळतो. भायखळा इथलं खिलाफत हाऊस हे इथल्या मिरवणुकीचं सर्वात प्रमुख ऐतिहासिक केंद्र आहे. इथून निघणारी ही मिरवणूक देशातल्या सर्वात जुन्या मिरवणुकांपैकी मानली जाते.
या मिरवणुकीत सुंदर सजवलेली वाहनं, उंट आणि बग्ग्यांचा समावेश असतो. यावर काबा शरीफ आणि मदीना शरीफच्या हुबेहूब प्रतिकृती उभारल्या जातात. सोबतच सुफी परंपरा दर्शवणारे सुंदर चित्ररथही तयार केले जातात. इथल्या मिरवणुकांचं हे वैशिष्ट्य आहे. या मिरवणुकात धार्मिक घोषणांसोबत मानवता, सलोखा, पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणासारखा सामाजिक संदेश देणारे बॅनर्सही यात आवर्जून पाहायला मिळतात.
या दिवशी लंगर-ए-रसूलची व्यवस्था केली जाते. ठिकठिकाणी सबीली (पाणपोया आणि स्टॉल्स) लावून वाटसरूंना प्रेमाने जेवण दिलं जातं. या जेवणात सालन, पोळी, बिर्याणी, पुलाव, जर्दा आणि हलवा अशा पदार्थांचा समावेश असतो. याशिवाय सरबत आणि थंड पाणीही वाटलं जातं. आजकाल बिस्किटं आणि फरसाणची पाकिटंही वाटली जातात. तसंच पाणी आणि शीतपेयांच्या बाटल्यांचंही वाटप केलं जातं.
या दिवशी घरांमध्ये चविष्ट पदार्थ बनवले जातात. यात हलवा, खीर आणि जर्दाचाही समावेश असतो. आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना गोड पदार्थ आवडायचे. याच उद्देशाने गोड पदार्थांवर नियाज (प्रार्थना) केली जाते. त्यानंतर हा तबर्रुक (प्रसाद) नातेवाईक आणि शेजाऱ्यांमध्ये प्रेमाने वाटला जातो.
हे सर्व सण केवळ आपली श्रद्धा नाहीयेत. ते आपली संस्कृती आणि सभ्यतेचं प्रतीक आहेत. हे सण आपल्या संस्कृतीचे वाहक आहेत. याच सणांच्या आधारावर आपल्या सर्व परंपरा आजपर्यंत जिवंत राहिल्या आहेत.
(लेखिका आलिमा आहेत. त्यांनी 'फहम अल कुराण' हे पुस्तक लिहिलंय.)