आज २६ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण भारतात आणि जगभरात 'ईद-ए-मिलाद-उन-नबी’ उत्साहात साजरी केली जात आहे. इस्लामचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिमांमधील काही गट ही ईद साजरी करतात. .
नेमकी काय असते ‘ईद ए मिलाद उन नबी’?
'मिलाद' हा मूळ अरबी शब्द 'विलादत' या शब्दावरून तयार झालाय. याचा अर्थ 'जन्म' असा होतो. त्यामुळे अरबी भाषेच्या दृष्टीने मिलाद म्हणजे जन्मदिवस . प्रेषित मोहम्मद (स.) यांच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटनांची आठवण काढणं, त्यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल (सीरत) माहिती सांगणं आणि त्यांच्यावर 'दुरूद व सलाम' पाठवून आदर व्यक्त करणं म्हणजे ईद ए मिलाद होय. या विशेष दिवशी विद्वानांनी मुस्लिम समाजाला पैगंबरांची नैतिकता, त्यांची वागणूक आणि त्यांच्या शिकवणीबद्दल मार्गदर्शन करणं अपेक्षित असतं.
कधी असते ईद-ए-मिलाद?
इस्लामिक कॅलेंडरनुसार 'रब्बी-उल-अव्बल' हा वर्षातला तिसरा महिना असतो. चंद्राच्या दर्शनानुसार सणाची तारीख ठरते. सुन्नी विद्वान १२ रब्बी-उल-अव्बलला हा सण साजरा करतात, तर शिया विद्वान १७ रब्बी-उल-अव्बलला हा दिवस मानतात. अनेक देशांमध्ये आणि भारतातही या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
भारतात कशी साजरी होते‘ईद ए मिलाद उन नबी’?
भारतात हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. ईद-ए-मिलादच्या दिवशी देशभरातली बरेलवी विचारधारेच्या मस्जीदी, मदरसे आकर्षक रोषणाईने सजवली जातात. मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये एकत्र येत दुरूद शरीफ म्हणजेच प्रेषित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दुआ करतात. ठिकठिकाणी नातख्वानी, नात-ए-पाक (प्रेषितांच्या स्तुतीपर कविता) गायली जातात. तर काही ठिकाणी 'मिलाद मेहफिल' आणि 'सीरत कॉन्फरन्स' आयोजित केल्या जातात. या विशेष कार्यक्रमांमध्ये उलेमा प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनावर, त्यांच्या विचारांवर आणि त्यांनी दिलेल्या शांतता व मानवतेच्या शिकवणीची उपस्थितांना आठवण करून देतात.
ईद-ए-मिलादच्या दिवशी निघणारे भव्य जुलूस (मिरवणुका) हे भारतातील या उत्सवाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. या मिरवणुकांमध्ये आबालवृद्ध नागरिक हातात हिरवे झेंडे आणि शांततेचा, प्रेमाचा संदेश देणारे फलक घेऊन सहभागी होतात. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि शरबत वाटप केले जाते. या सणाच्या निमित्ताने दानधर्माला (खैरात) विशेष महत्त्व दिले जाते. गरिबांना आणि गरजू लोकांना अन्नदान (नियाज) केले जाते. तसेच रुग्णालये आणि अनाथ आश्रमांमध्ये जाऊन फळे आणि कपड्यांचे वाटप करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
प्रेषित मुहम्मदांविषयी नेमक काय सांगतं पवित्र कुराण?
कुराणच्या अनेक आयतींमधून (श्लोकांमधून) पैगंबरांच्या जन्माचा आनंद साजरा करण्याविषयी थेट आदेश किंवा सल्ला मिळत नाही. मात्र कुराणाने प्रेषितांचा केलेल्या गौरवाचा विचार करता, त्यांची जयंती साजरी करण्यात काही वावगं नसल्याचे किंवा सत्कार्य असल्याचे अनेक विद्वान मानतात
अल्लाह कुराणात म्हणतो, "आणि आम्ही तुम्हाला रहमत उल आलमीन म्हणजे सर्व जगासाठी 'कृपा' म्हणून पाठवलंय" (सुरा अल-अंबिया, आयत १०७). त्यामुळे अल्लाहच्या या सर्वोच्च कृपेबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करणं, हे कुराणच्या शिकवणीला धरूनच आहे, असे काही विद्वान मानतात.
हदीसमध्ये काय पुरावे आहेत?
स्वतः पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांनी स्वतःच्या जन्मदिवसाविषयी त्रोटक भाष्य केलं आहे. ते दर सोमवार उपवास ठेवत असत. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, "याच दिवशी माझा जन्म झाला आणि याच दिवशी माझ्यावर कुराण अवतरलं" (मिशकात शरीफ). यावरून मिलाद साजरा करणं ही 'सुन्नत' (पैगंबरांची परंपरा) असल्याचं स्पष्ट होतं.
थोर उलेमांचं मत
इमाम अल-सुयुती आणि इमाम इब्न हजार यांसारख्या नामवंत विद्वानांनी ईद-ए-मिलादच्या दिवशी एकत्र येणं, कुराण पठण करणं, अन्नदान करणं आणि प्रेषितांच्या जन्माचा आनंद साजरा करणं ही 'बिदअत हसना' (चांगली प्रथा) असल्याचं स्पष्ट केलंय.
२०२६ ची ईद-ए-मिलाद साजरी करताना आपण हे लक्षात ठेवायला हवं, ही ईद केवळमस्जीदिंमध्ये जमणं किंवा मिरवणुका काढणं यापुरतीच मर्यादित नाही. तर पैगंबरांनी दिलेला शांतता, प्रेम, मानवता आणि बंधुभावाचा खरा संदेश आपल्या आचरणातआणण्याचा निर्धार करण्याचा दिवस आहे. त्यांच्या शिकवणीतून धडा घेऊन मोमीन म्हणजेच चांगला माणूस बनणं, हीच खऱ्या अर्थाने पैगंबरांना दिलेली सर्वोच्च मानवंदना ठरेल.