नवी दिल्ली
दिग्दर्शक शशांक वालिया यांचा 'बर्ड्स इन द डार्क' (Birds in the Dark) आणि तमिळ लेखक-दिग्दर्शक शैलेश रत्नकुमार यांचा पदार्पणातील 'सेलवी' (Selvi) हे दोन भारतीय चित्रपट ३१ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Busan International Film Festival) प्रीमियरसाठी निवडले गेले आहेत. आगामी ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मानाच्या चित्रपट महोत्सवातील 'व्हिजन - आशिया' या विभागात हे दोन्ही चित्रपट दाखवले जाणार आहेत.
पंजाबच्या पार्श्वभूमीवर बेतलेला 'बर्ड्स इन द डार्क' हा चित्रपट एका पोलीस एजंट आणि एका आरोपीमधील मानवी नातेसंबंधांवर भाष्य करतो. या चित्रपटाची निर्मिती रीमा कौर, हंसल मेहता आणि साहिल सैगल यांनी केली आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील हिची मुख्य भूमिका असलेला 'सेलवी' हा चित्रपट होम-केअर वर्क्स (घरगुती आरोग्य परिचारिका) यांच्या अदृश्य आणि संघर्षाने भरलेल्या जगावर प्रकाश टाकतो. या चित्रपटाची निर्मिती रेड सी फंड आणि हाँगकाँग आशिया फिल्म फायनान्सिंगच्या पाठिंब्याने करण्यात आली असून, अंजली पाटील स्वतः या चित्रपटाची सहनिर्माती आहे.
'सेलवी' चित्रपटाची कथा तमिळनाडूतील लहान शहरांमधून स्थलांतरित होऊन इतरांच्या सेवेसाठी अहोरात्र खपणाऱ्या महिला परिचारिकांच्या आयुष्यावर आधारित आहे. दिग्दर्शक शैलेश रत्नकुमार यांनी छायाचित्रकार भार्गव श्रीधर यांच्यासोबत स्वतःच्या अनुभवातून ही पटकथा लिहिली आहे. जागतिक मंचावर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो भारतातील प्रेक्षकांपर्यंत आणणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल, अशी भावना अभिनेत्री अंजली पाटील हिने व्यक्त केली आहे.