मुंबई
महाराष्ट्रभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (RTO) सोमवारी ३३१ ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे पुरेसे व्यवहारज्ञान नसल्यामुळे कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) १३९ चालकांचा समावेश आहे.
राज्यात २० ऑगस्टपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेअंतर्गत सोमवारी आरटीओ पथकांनी एमएमआर क्षेत्रात १,३९२ वाहनांची तपासणी केली. त्यात १३९ चालकांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळून आले. तर उर्वरित महाराष्ट्रात ३,४१५ रिक्षा व टॅक्सी चालकांची तपासणी करून १९२ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत आरटीओ पथकांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३५,१९० वाहनांची तपासणी केली असून, त्यात एकट्या एमएमआर परिसरातील १४,३९९ वाहनांचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान नियम न पाळणाऱ्या राज्यभरातील एकूण ४,७२९ चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एमएमआरमधील २,२३९ चालकांचा समावेश आहे.
सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या आणि प्रवाशांशी रोज संपर्क येणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषेचे प्राथमिक संभाषणज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने चालकांसाठी महिनाभराची विशेष तपासणी मोहीम जाहीर केली असून, ज्यांना मराठीचे ज्ञान नाही त्यांना सुधारणेसाठी मुदत दिली जात आहे.