Ganesh Utsav Mumbai: ३४ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; मुंबईत कडेकोट बंदोबस्तात बाप्पाला निरोप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
मुंबईत कडेकोट बंदोबस्तात बाप्पाला निरोप
मुंबईत कडेकोट बंदोबस्तात बाप्पाला निरोप

 

मुंबई 

भावनिक वातावरणात आणि अथांग जनसागराच्या उपस्थितीत मुंबईच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. तब्बल २१ तासांच्या मॅरेथॉन विसर्जन मिरवणुकीनंतर दक्षिण मुंबईतील चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा यांसारख्या प्रसिद्ध बाप्पांच्या मूर्ती शनिवारी सकाळी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. १२ दिवसांच्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सांगता झाली.

शुक्रवारी सकाळी अनंत चतुर्दशीपासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्रभर अखंड सुरू होत्या. हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबतीने रस्ते दुमदुमून सोडले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईभरात ३४ हजार ४०३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये ६ हजार २३५ सार्वजनिक मूर्ती, २७ हजार ६१५ घरगुती गणपती आणि ५५३ गौरीच्या मूर्तींचा समावेश आहे. विसर्जन प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली असून कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

चोख सुरक्षा आणि प्रशासकीय तयारी

प्रसिद्ध 'चिंचपोकळीचा चिंतामणी' साडेसात वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचला, तर 'लालबागचा राजा' गर्दीने फुललेल्या रस्त्यांवरून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ होत होता. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आणि पालिकेने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात २४ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि २५ हजार पालिका अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि ३८३ कृत्रिम तलावांवर जीवरक्षक, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली होती.