नवी दिल्ली
भारताच्या सांस्कृतिक वारशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, मध्य प्रदेशातील उदयगिरी लेण्यांसह पाच नव्या ऐतिहासिक स्थळांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत (Tentative List) समावेश करण्यात आला आहे. पीआयबी कल्चरने (PIB Culture) 'एक्स'वर पोस्ट करत हा देशाच्या वारशासाठी अभिमानास्पद टप्पा असल्याचे म्हटले आहे.
भारताची युनेस्कोची तात्पुरती यादी आता ७८ स्थळांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये बाग लेण्यांची चित्रे, चंबळ खोऱ्यातील मंदिरांचा समूह, उदयगिरी लेणी, गिनोरगड किल्ला आणि भारत-दक्षिण आफ्रिका ट्रान्सनॅशनल प्रस्तावांतर्गत 'सत्याग्रहाची ठिकाणे' यांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशातील उदयगिरी टेकडीवर गुप्त राजवटीच्या काळात चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात आणि पाचव्या शतकाच्या सुरुवातीला विकसित झालेली प्राचीन दगडी शिल्पे आणि पवित्र वास्तू आहेत. याशिवाय, विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिण उतारावर वाघा नदीच्या काठावर बौद्ध लेण्यांचा समूह असलेल्या 'बाग केव्ह्स'चाही यात समावेश आहे. मध्य प्रदेशातील राज गोंड राज्यकर्त्यांची राजधानी असलेला गिनोरगड किल्ला आणि चंबळ खोऱ्यातील Bateshwar, Padavali आणि Kakarmath या मंदिरांचा समूह यादीत स्थान मिळवणारी इतर ठिकाणे आहेत.
पाचवा प्रस्ताव हा महात्मा गांधींच्या 'सत्याग्रह' संकल्पनेच्या विकासाशी संबंधित आहे. दक्षिण आफ्रिकेतील दोन आणि भारतातील सात अशा एकूण नऊ घटकांचा यात समावेश आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील पिएटरमॅरिट्झबर्ग स्टेशन आणि फिनिक्स सेटलमेंट, तर भारतातील साबरमती आश्रम, मणि भवन, सेवाग्राम आश्रम, आगाखान पॅलेस यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकनासाठी विचार केला जाण्यापूर्वी एखाद्या स्थळाचे नाव या तात्पुरत्या यादीत असणे बंधनकारक असते.