अल्फिया शेख/ पुणे
येत्या २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात निघणाऱ्या ईद-ए-मिलादच्या पवित्र मिरवणुकीत जर डीजे वाजला, तर थेट पोलीस प्रशासनावरच न्यायालयाच्या अवमानाचा (Contempt of Court) खटला दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा पुण्याच्या 'मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन'ने दिला आहे. "डीजेचा आवाज कमी-जास्त करण्याचा प्रश्नच येत नाही, डीजे पूर्णपणे बंदच व्हायला हवा," अशी कोणतीही तडजोड न स्वीकारणारी ठाम भूमिका या फाउंडेशनने घेतली आहे.
पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी ईमेल!
या प्रश्नावर केवळ तोंडी मागणी न करता, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख आणि संचालक अन्वर शेख यांनी रविवारी, २३ ऑगस्ट रोजी रात्री ९:३५ वाजता पुणे पोलीस आयुक्तालयाला (CP) रीतसर लेखी ईमेल पाठवला आहे. हा ईमेल फक्त एका पोलीस स्टेशनला नाही, तर पुण्याचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, सर्व डीसीपी (DCP), एसीपी (ACP), क्राईम ब्रँच, स्पेशल ब्रँच आणि सर्व संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना पाठवण्यात आला आहे.
नाना पेठ येथून सुरू होऊन कॅम्प, एम. जी. रोड मार्गे गणेश पेठेत समाप्त होणाऱ्या या मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
धार्मिक सण की डीजेची स्पर्धा?
ईद-ए-मिलाद हा प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा पवित्र सण आहे, जो शांतता, प्रेम, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देतो. फाउंडेशनने अतिशय परखडपणे विचारले आहे की, या मिरवणुकीत नात, सलाम आणि सीरत असायला हवी. मोठे डीजे आणि त्यावर वाजणारी फिल्मी किंवा अश्लील गाणी हा या धार्मिक परंपरेचा भाग नक्कीच नाही. मग डीजे आणतो कोण? त्याचे आयोजन कोण करते आणि या सगळ्याला 'फंडिंग' कोठून मिळते, याची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाने केली पाहिजे, असा महत्त्वाचा मुद्दा फाउंडेशनने उपस्थित केला आहे.
२०२२ च्या त्या दुर्दैवी घटनेची आठवण
हा विषय एका धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित नसून, तो नागरिकांच्या शांतता, आरोग्य आणि सुरक्षेशी जोडलेला आहे. मिस फराह फाउंडेशनने निदर्शनास आणून दिले आहे की, २०२२ मध्ये डीजेच्या अतिप्रचंड आवाजामुळे एका वृद्ध व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या कर्कश आवाजामुळे आणि ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी माणसे आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
"आता जबाबदारी पूर्णपणे पोलिसांचीच!"
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवत फाउंडेशनने निवेदनातून सुनावले आहे की, "मिरवणूक डीजेमुक्त ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. दरवर्षी पोलिसांच्या उपस्थितीत डीजे वाजतात आणि मग केवळ 'डीजे बंद आहे' किंवा 'आवाज कमी ठेवा' अशी जुजबी कारवाई दाखवली जाते, हे पुरेसे नाही. कायदा आणि नियमांची जमिनीवर अंमलबजावणी करणे ही पोलिसांचीच जबाबदारी आहे."
मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर ध्वनीमर्यादेचे पालन होत आहे की नाही, याची पोलीस प्रशासनाने स्वतः पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्याही दबावाशिवाय कारवाई करावी, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
जर २६ ऑगस्टच्या मिरवणुकीत डीजे वाजले आणि पोलिसांनी नियमांनुसार कारवाई केली नाही, तर फाउंडेशन पोलिसांच्या या निष्क्रियतेविरोधात थेट न्यायालयात दाद मागेल आणि 'कंटेम्प्ट ऑफ कोर्ट'ची कारवाई सुरू करेल.
"ही धमकी नाही, तर कायदेशीर मार्ग आहे"
शेवटी फाउंडेशनने हेही स्पष्ट केले आहे की, "हा कोणताही पोकळ इशारा किंवा धमकी नाही. गेल्या १० वर्षांपासून मुस्लिम समाजातील नागरिक आणि ५-६ वर्षांपासून आमचे फाउंडेशन यासाठी शांततेच्या मार्गाने पाठपुरावा करत आहे. आम्हाला ईद-ए-मिलादची मिरवणूक थांबवायची नाहीये. आम्हाला फक्त एवढंच हवंय की ही मिरवणूक शांततापूर्ण, धार्मिक, शिस्तबद्ध आणि पूर्णपणे डीजेमुक्त असावी."
हेही वाचा: जयपूरचा प्रसिद्ध मौलाना झियाउद्दीन दर्गा २०० वर्षांपासून देतोय प्रेमाचा संदेश!
सणाच्या नावाखाली होणारा धिंगाणा थांबवण्यासाठी मुस्लिम समाजातूनच पुढे आलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. आता पुणे पोलीस या निवेदनाची आणि इशाऱ्याची किती गंभीर दखल घेतात आणि २६ ऑगस्टच्या मिरवणुकीत डीजेला खरोखरच चाप बसतो का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.