नवी दिल्ली
फ्लाईदुबईच्या विमानावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेले भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छहर यांच्यावर अबू धाबीमधील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बुधवारी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी द्विसाप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कॅप्टन मच्छहर हे अबू धाबी येथील रुग्णालयात उपचार घेत असून आमचा भारतीय दूतावास त्यांच्या कुटुंबियांच्या आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे, असे त्यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती सातत्याने सुधारत असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.
यादरम्यान, सीमेवरील घुसखोरीबाबत पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांवर बोलताना जयस्वाल यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. अनेक वर्षे सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाने खोटे बोलणे हा आपला स्वभाव बनवला आहे, असे ते म्हणाले. फिरोजपूर सेक्टरमधील घटनेबाबत पाकिस्तानचे निराधार आरोप भारताने यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.