राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत तीव्र निदर्शने; CEC विरोधात काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
राहुल गांधी यांना पोलीस धरून नेताना
राहुल गांधी यांना पोलीस धरून नेताना

 

नवी दिल्ली 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी नवी दिल्लीत तीव्र निदर्शने केली. शाकाहारी दुपारच्या भोजन बैठकीनंतर जंतरमंतरच्या दिशेने निघालेला बस मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला आणि राहुल गांधींसह अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी हे आंदोलन रोखले.

राजीनाम्यापर्यंत मागे हटणार नाही

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असे स्पष्ट करत राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात पवित्र गोष्टीचे रक्षण करण्याची ही लढाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आम्हाला रोू शकत नाही, असे ते म्हणाले. जंतरमंतरच्या दिशेने निघालेल्या बस मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांसोबत बराच गोंधळ उडाला. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वडरा यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन रस्त्यावर झोपून तीव्र विरोध दर्शवला.

बस मोर्चा आणि धरणे आंदोलन

तब्बल तीन तास चाललेल्या या बस यात्रेदरम्यान शांग्री-ला हॉटेलजवळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विरोधकांना अडवले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जनपथ येथील रेस्टॉरंटमधील बैठकीनंतर हे आंदोलन सुरू झाले होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय-एम, सीपीआय, राजद आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी बळाचा वापर करून व्हॅनमध्ये बसवून स्थानबद्ध केले. विरोधकांचा हा लढा सुरूच राहणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.