जयपूरचा प्रसिद्ध मौलाना झियाउद्दीन दर्गा २०० वर्षांपासून देतोय प्रेमाचा संदेश!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 7 h ago
जयपूरमधील ऐतिहासिक मौलाना झियाउद्दीन दर्गा
जयपूरमधील ऐतिहासिक मौलाना झियाउद्दीन दर्गा

 

फरहान इस्रायली 

जयपूरच्या जुन्या चुंगी आणि ऐतिहासिक चार दरवाजाजवळ हजरत मौलाना झियाउद्दीन शाह-ए-विलायत (रहमतुल्लाह अलैह) यांचा आस्ताना आहे. हे धार्मिक स्थळ राजस्थानच्या सामायिक वारशाचं आणि गंगा-जमुनी संस्कृतीचं मोठं केंद्र आहे. जवळपास दोनशे वर्षांपासून ही खानकाह प्रेम, माणुसकी आणि परस्पर बंधुभावाचा संदेश वाटत आहे. धर्म आणि जातीपातीच्या भिंती पूर्णपणे ओलांडून सर्व समुदायांचे लोक तिथे नवस फेडायला येतात.

दर्गा परिसरात मुघल वास्तुकलेतून बांधलेली मशीद, आस्ताने, खानकाह, कुटुंबाची दफनभूमी, बाग आणि तलाव आहेत. हा संपूर्ण परिसर जुन्या काळाची आठवण करून देतो. त्या काळात सुफी आस्ताने हे आध्यात्मिक शिक्षण, उत्तम चारित्र्य, समाजसेवा आणि योग्य मार्ग दाखवण्याचं ते मोठं साधन होते.

दर्ग्याचे सध्याचे सज्जादानशीन आणि गद्दीनशीन सय्यद झियाउद्दीन झियाई (झिया मियाँ) या आध्यात्मिक परंपरेबद्दल सविस्तर माहिती देतात. त्यांचा सिलसिला 'फखरी निजामी चिश्ती' आहे, असं ते सांगतात. त्यांचं कुटुंब चिश्तिया, कादरिया, सुहरवर्दिया आणि नक्शबंदिया अशा अनेक परंपरांशी जोडलेलं आहे. तरीही त्यांची मुख्य ओळख 'चिश्तिया निजामिया चिश्ती' याच परंपरेशी आहे. हजरत मौलाना फखरुद्दीन फखर-ए-जहाँ देहलवी (रहमतुल्लाह अलैह) हे या परंपरेतले महान बुजुर्ग झाले. त्यांच्याच आध्यात्मिक धाग्याशी जोडले जाऊन हजरत मौलाना झियाउद्दीन साहेब यांनी आपलं काम सुरू केलं. संपूर्ण राजस्थान आणि हिंदुस्थानात त्यांना "मौलाना साहेब जयपुरी" या नावाने ओळखलं आणि मानलं जातं.

हजरत मौलाना झियाउद्दीन साहेब यांचा जन्म ११५० हिजरीमध्ये दिल्लीच्या ग्यासपूर भागात झाला. ते प्रतिष्ठित सय्यद कुटुंबातले होते. त्यांच्या आई आणि वडील या दोघांचीही वंशावळ हसनी-हुसैनी चिश्ती परंपरेशी जुळते. सुफी परंपरेत अशा पवित्र कुटुंबाला 'नजीबुत-तरफैन' म्हटलं जातं. मौलाना साहेबांना चिश्ती, कादरिया, नक्शबंदिया, सुहरवर्दिया, नूरबख्शिया, शत्तारी आणि फिरदौसिया अशा अनेक सुफी परंपरांमध्ये शिष्य बनवण्याची विशेष परवानगी मिळाली होती. त्यांचे अनुयायी त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शक आणि त्यांच्या काळातले 'कुतुब' मानतात.

दिल्ली ते जयपूरचा प्रवास आणि जयनगरची भूमी

भारतात चिश्तिया परंपरेचा पाया हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती गरीब नवाज अजमेरी यांनी रचला. त्यांच्या पश्चात ही मोठी जबाबदारी ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी, बाबा फरीदुद्दीन गंज-ए-शकर आणि हजरत निजामुद्दीन औलिया महबूब-ए-इलाही यांच्याकडे आली. हजरत निजामुद्दीन औलिया यांच्यानंतर हा प्रवाह 'चिश्तिया निजामिया' या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाला.

काळाच्या ओघात या परंपरेत अनेक बदल झाले. पुढे हजरत शेख कलीमुल्लाह जहानाबादी आणि त्यांच्या वारसदारांनी तिला नवी ताकद दिली. हजरत मौलाना फखरुद्दीन फखर-ए-जहाँ देहलवी याच साखळीतले प्रसिद्ध बुजुर्ग होते. हजरत मौलाना झियाउद्दीन साहेब त्यांच्या सर्वात प्रमुख आणि लाडक्या खलिफांमध्ये नेहमी गणले जायचे. मौलाना झियाउद्दीन साहेब जयपूरला आले. त्यावेळी या शहराला 'जयनगर' या नावाने ओळखलं जायचं. त्यांनी हळूहळू जयपूरला आपल्या आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं मुख्य केंद्र बनवलं. त्यांच्या खानकाहमध्ये रात्रंदिवस लोकांची गर्दी असायची. सर्व समाजातले लोक त्यांच्याशी जोडले गेले.

दर्ग्याच्या जुन्या कथांनुसार त्यांची वाढती लोकप्रियता पाहून काही लोकांनी तत्कालीन महाराजा सवाई प्रताप सिंह यांच्या दरबारात तक्रार केली. महाराजांनी मौलाना साहेबांना दरबारात हजर करायला आपल्या सैनिकांना पाठवलं. सैनिक मौलाना साहेबांच्या जवळ पोहोचूच शकले नाहीत आणि पुढे जाण्यात पूर्णपणे अपयशी ठरले, असं लोक सांगतात. ही घटना लोक चमत्कार म्हणून मानतात. यानंतर महाराजा सवाई प्रताप सिंह स्वतः मौलाना साहेबांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पहिल्याच भेटीत राजा मौलाना साहेबांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाने आणि साधेपणाने प्रभावित झाला. त्यांच्या मनात संतांबद्दल खोलवर आदर निर्माण झाला. त्यानंतर हा आस्ताना ज्ञान, सुफीवाद आणि लोककल्याणाचं मोठं केंद्र बनला.

शिक्षण आणि आध्यात्मिक प्रशिक्षणाचं केंद्र

जयपूरला आल्यावर सुरुवातीच्या दिवसांत मौलाना झियाउद्दीन साहेबांनी कमानगरान मोहल्ल्यात आपलं निवासस्थान बनवलं. नंतर त्यांनी चार दरवाजाजवळच्या हांडीपुरा मोहल्ल्याला आपलं मुख्य केंद्र बनवलं. त्यांच्या ज्ञानसभा तिथेच मदरसा मौलाना साहेब आणि मशीद मौलाना साहेबमध्ये भरू लागल्या.

हळूहळू हे ठिकाण धार्मिक शिक्षण आणि आत्मिक सुधारणेचं मोठं केंद्र बनलं. तिथे माणसाचं चारित्र्य सुधारण्यावर आणि त्याच्यात माणुसकी जागृत करण्यावर जास्त भर दिला जायचा. कुराण, हदीस आणि फिकहच्या शिक्षणासोबतच सुफी विचारांची शिकवण तिथे दिली जायची. विद्यार्थी इथे येऊन पुस्तकी ज्ञानासोबतच प्रामाणिकपणा, स्वतःचं मूल्यमापन करणं आणि मानवतेचे गुण शिकत असत.

या खानकाहचं नाव केवळ जयपूर किंवा राजस्थानपुरतं मर्यादित नव्हतं. दिल्ली, उत्तर प्रदेश, दख्खन, अफगाणिस्तान आणि अगदी चीनमधूनही विद्यार्थी व भाविक शिक्षण व प्रार्थना घ्यायला इथे यायचे. खानकाहचे दोन भाग प्रसिद्ध आहेत. पहिला भाग 'गुलाबी दालान' आहे. तिथे मदरशाचे वर्ग भरायचे, सार्वजनिक सभा आणि जलसे आयोजित केले जायचे. दुसरा भाग 'संदली दालान' आहे. ही हजरत मौलाना झियाउद्दीन साहेबांच्या वैयक्तिक उपासनेची जागा होती. तिथे बसून ते दीर्घ साधना, जिकिर आणि रियाजत करत असत.

दर्गा, मशीद आणि बांधकामाचा रंजक किस्सा

अठराव्या शतकाच्या शेवटी हजरत मौलाना झियाउद्दीन साहेबांनी चार दरवाजाजवळ खानकाह, मशीद आणि दर्गा परिसराचं बांधकाम सुरू केलं. हा परिसर पुढे त्यांच्या आध्यात्मिक वारशाचं कायमस्वरूपी घर बनला. बांधकामाशी जोडलेला रंजक किस्सा लोक आजही सांगतात. मौलाना साहेब मजुरांना मजुरी द्यायला आपल्या मुसल्ल्याखालून (प्रार्थनेच्या चटईखालून) नाणी काढून द्यायचे. एका मजुराच्या मनात लालसा निर्माण झाली. मुसल्ल्याखाली खजिना लपलेला आहे, असा विचार त्याने केला. रात्रीच्या अंधारात जाऊन त्याने त्या जागेची खोदाई केली. पण त्याला तिथे मातीशिवाय दुसरं काहीही मिळालं नाही.

दुसऱ्या दिवशी तो मजूर कामावर आला. त्यावेळी मौलाना साहेबांनी हसत हसत त्याला दोन दिवसांची मजुरी हातावर ठेवली. तू रात्रीही खूप मेहनत केली आहेस, असं ते त्याला म्हणाले. मौलाना साहेबांचं हे बोलणं आणि त्यांचं मखमली हृदय पाहून तो मजूर खूप रडला. त्यानंतर तो लगेचच त्यांचा निष्ठावान शिष्य बनला.

टोंकचे नवाब मीर खान यांचं समर्पण

मौलाना झियाउद्दीन साहेबांचा प्रभाव जयपूरच्या बाहेरही खूप दूरपर्यंत पसरलेला होता. टोंकचे नवाब मीर खान यांच्याशी जोडलेली कथा दर्ग्याच्या इतिहासात नोंदलेली आहे. एकदा नवाबाच्या कैदेतून पळालेला माणूस मौलाना साहेबांचे शिष्य काझी साहेब यांच्या आश्रयाला आला. काझी साहेबांनी त्या असहाय्य माणसाला नवाबाच्या हवाली करायला स्पष्टपणे नकार दिला.

नवाबाच्या सैन्याने काझी साहेबांच्या घराला वेढा घातला. स्वतःला संकटात पाहून काझी साहेबांनी आपले पीर मौलाना झियाउद्दीन साहेबांचं स्मरण केलं. नवाब मीर खान याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर तो स्वतः चालत जयपूरला आला. तो मौलाना साहेबांच्या सेवेत हजर झाला. त्याने आपली तलवार आणि पगडी त्यांच्या चरणांवर ठेवली. नवाबाने मौलाना साहेबांसमोर आपलं डोकं टेकवलं आणि तो त्यांचा शिष्य बनला.

खिदमत-ए-हल्क: मानवतेची निस्वार्थ सेवा

या खानकाहची सर्वात मोठी ताकद तिची निस्वार्थ सेवेची भावना होती. चिश्ती परंपरेत देवाने निर्माण केलेल्या जगाची सेवा करणं, हीच सर्वात मोठी इबादत मानली जाते. म्हणूनच या आस्तानेचे दरवाजे प्रत्येक गरीब, भुकेलेला, मुसाफिर आणि संकटात असलेल्या माणसासाठी नेहमी उघडे असत.

इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या राहण्या-खाण्याची आणि इतर सर्व गरजांची काळजी घेतली जायची. दूरवरून येणाऱ्या प्रवाशांच्या विश्रांतीची खास व्यवस्था तिथे होती. पहिल्यांदा येणाऱ्या व्यक्तीचा पाहुणचार करायचा, मग त्याची समस्या ऐकून त्यावर योग्य तोडगा काढायचा, असा मौलाना साहेबांचा कडक नियम होता. मौलाना साहेबांच्या संयमाचं आणि शांत स्वभावाचंही उदाहरण दिलं जातं. एकदा त्यांच्या मजलिसमध्ये बसून माणूस सुफी आणि संतांना शिव्याशाप देऊ लागला. मौलाना साहेबांनी त्याला अजिबात अडवलं नाही किंवा कोणताही राग व्यक्त केला नाही. ते शांत मनाने त्याचं पूर्ण बोलणं ऐकत राहिले. तो माणूस बोलून बोलून पूर्णपणे थकला. त्यानंतर मौलाना साहेबांनी त्याला सन्मानाने गोड खाऊ घातलं आणि हसत हसत पुन्हा येण्याचं प्रेमाने आमंत्रण दिलं.

मौलाना साहेबांचं हे वागणं पाहून तो माणूस थक्क झाला. हे फकिराचं घर आहे, असं मौलाना साहेब त्यावेळी म्हणाले. लोकांची मनं जिंकणं हे फकिराचं मुख्य काम असतं, त्यांना तोडणं नाही, हा संदेश त्यांनी दिला.

उरूस आणि वसंतोत्सवाच्या परंपरा

हजरत मौलाना झियाउद्दीन साहेब यांचा उरूस दरवर्षी इस्लामी महिना जिल्कादच्या २१ ते २५ तारखेपर्यंत थाटामाटात साजरा केला जातो. २५ जिल्काद १२३० हिजरी रोजी त्यांचं निधन झालं. उरुसादरम्यान मिलाद शरीफ, मुशायरा, महफिल-ए-समा, कुल शरीफ आणि प्रार्थनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

याशिवाय रज्जबच्या महिन्यात ख्वाजा गरीब नवाज यांच्या स्मरणार्थ विशेष सभाही होतात. या दर्ग्यात गेल्या शतकापासून वसंतोत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा चालत आलेली आहे. वसंत पंचमीच्या दिवशी मजार शरीफवर पिवळी मोहरीची फुलं अर्पण केली जातात. हे हिंदू-मुस्लिम एकतेचं सुंदर उदाहरण आहे.

सज्जादानशीनांचा आध्यात्मिक वारसा

मौलाना झियाउद्दीन साहेबांनंतर त्यांचे पुतणे हजरत सय्यद गुलाम रसूल साहेब यांनी दर्ग्याची गादी सांभाळली. सज्जादानशीनचं पद ही काही कोणती खुर्ची किंवा ओहदा नाही, असं सध्याचे गद्दीनशीन सय्यद झियाउद्दीन झियाई (झिया मियाँ) सांगतात. वृद्धांनी दिलेली शिकवण, खानकाहच्या परंपरा आणि मानवतेचा संदेश पुढे नेण्याची ती मोठी जबाबदारी आहे, असं ते मानतात.

झिया मियाँ यांनी आपलं शिक्षण जयपूर आणि राजस्थान विद्यापीठातून पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी औरंगाबादमधून एलएलबीची पदवीही संपादन केली. सुफी परंपरेचा खरा उद्देश माणसाचं चारित्र्य सुधारणं हा आहे, असं ते स्पष्टपणे सांगतात. आपल्या पीर-ओ-मुर्शिदकडून मिळणारं शिक्षण माणसाला योग्य-अयोग्यामधला फरक समजावतं. तसंच ते त्याला समाजाप्रती जबाबदार बनवतं.

हेही वाचा: आरामबागच्या मियापारा परिसरातील ऐतिहासिक आणि पवित्र सुफी दर्ग्याची कहाणी

संध्याकाळ होताच दर्ग्याच्या खुल्या अंगणात दिवे उजळतात. प्रार्थनेसाठी हात वर उठताक्षणी वेगवेगळ्या धर्मांचे लोक खांद्याला खांदा लावून एकत्र उभे असलेले तिथे दिसतात. दोनशे वर्षांपासून उभा असलेला हा आस्ताना आजही जयपूर शहराच्या सामायिक संस्कृती, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश सर्वांना देतोय.



Latest News