अमृतसर
श्री अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी कुल्दीप सिंग गरगज्झ यांनी पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ शरीफ यांना पत्र लिहून लाहोरच्या वॉर्ड शहरामधील (Walled City) शिखांच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण आणि जतन करण्याची मागणी केली आहे. विशेषतः शीख धर्माचे पाचवे गुरू गुरु अर्जुन देव यांच्या बलिदानाशी संबंधित असलेल्या 'लाल खोह' आणि 'कत्तारी चंदू' या ऐतिहासिक स्थळांच्या सुरक्षेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रांतीय मंत्री आणि पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंघक समितीचे (PSGPC) अध्यक्ष रमेश सिंग अरोरा यांनाही हे पत्र पाठवण्यात आले आहे. जथेदार गरगज्झ यांनी स्पष्ट केले की, या पत्राचा उद्देश कोणत्याही सरकार किंवा संस्थेवर आरोप करणे नसून लाहोरमधील सामायिक ऐतिहासिक वारशाकडे आणि शीख इतिहासाच्या महत्त्वाच्या अध्यायांकडे लक्ष वेधणे हा आहे.
या ऐतिहासिक स्थळांच्या आसपास सुरू असलेल्या बांधकामामुळे शीख संगतामध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान पंजाब सरकारने या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत तेथील सर्व प्रकारचे बांधकाम किंवा फेरफार थांबवावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच लाहोरमधील शीख इतिहासाशी संबंधित सर्व प्रमुख स्थळांचे सर्वसमावेशक वारसा सर्वेक्षण करून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.