मुंबई
सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रशासनाने वर्षभरातील सर्व सणांसाठी एक कायमस्वरूपी 'स्थायी आदेश' जारी केला असून, त्याच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी 'फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टल' सुरू करण्याची घोषणा केली आहे.
उत्सवांच्या दिवसांत मोदक, पेढा, खवा, पनीर, तूप, दूध, दही, खाद्यतेल, ड्रायफ्रूट्स तसेच भगर, साबुदाणा व राजगिरा यांसारख्या उपवासाच्या पदार्थांची मागणी अल्पावधीत বহूपटीने वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन बाजारात भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नपदार्थ आणले जाण्याची शक्यता असते. हे रोखण्यासाठी https://complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवता येईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.
हे पोर्टल लेव्हल-१ (राज्यस्तरीय), लेव्हल-२ (प्रादेशिक) आणि लेव्हल-३ (स्थानिक) अशा तीन स्तरांवर वर्गीकृत करण्यात आले आहे. या माध्यमातून सार्वजनिक 'भंडारा', 'अन्नछत्र' आणि 'महाप्रसाद' यांसारख्या उपक्रमांची माहिती मंडळे ऑनलाईन सादर करू शकतात.
पोर्टलवर भंडारा आणि महाप्रसाद आयोजनासाठी ३ हजार १९८ अर्ज प्राप्त झाले असून, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३८३ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच १ ते २३ सप्टेंबर दरम्यान राज्यभरात ३ हजार ६८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान त्रुटी आढळलेल्या १ हजार ५०६ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. गंभीर उल्लंघन करणाऱ्या २४८ आस्थापनांचे परवाने निलंबिट करण्यात आले असून १२ परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच कायद्यान्वये ४५५ प्रकरणे दाखल करण्यात आली असून त्यापैकी ३९८ प्रकरणांची विल्हेवाट लावून ५३.६० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.