नवी दिल्ली
देशाला २०२४ (2047) पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 'वी विल डू इट' (We Will Do It) हा नवीन नारा दिला आहे. दूरदर्शी धोरणे आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे लक्ष्य साध्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित 'विकसित भारत संकल्प सभेला' संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासमोर असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे मतांच्या आधारे समाजाचे होणारे विभाजन. "शेतकऱ्याच्या शेतात पाणी नसेल तर ती समस्या एकाच जातीची असते का? वीज नसेल तर अंधार एकाच समुदायात पसरतो का? जर समस्या सर्वांची असेल तर उपायही सर्वांसाठीच असला पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या थांबण्याचे कोणतेही कारण नाही. शंभर वर्षांपूर्वी आपली लोकसंख्या ४० कोटींपेक्षा कमी होती, आज आपण १४० कोटींहून अधिक आहोत. १४० कोटी नागरिक मिळून २०२४ (2047) पर्यंत विकसित भारताची निर्मिती करतील आणि आपण नक्कीच हे करून दाखवू.
पंतप्रधानांनी 'विकसित भारत २०२४ (2047): वी विल डू इट', 'टॉप ३ अर्थव्यवस्था: वी विल डू इट', 'स्वयंपूर्ण: वी विल डू इट', 'जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब: वी विल डू इट', 'ऑलिम्पिकचे यजमानपद: वी विल डू इट', 'अंतराळात झेप: वी विल डू इट' असे सांगत देशाच्या अफाट ऊर्जेवर आणि आत्मविश्वासावर भर दिला. एका दशकात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचे सांगत भारताने हे शक्य करून दाखवल्याचे त्यांनी नमूद केले.
फ्लाईदुबईचे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छहर यांनी दाखवलेल्या शौर्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, आज जग आपल्या पायलटबद्दल बोलत आहे आणि एक दिवस असा येईल जेव्हा जग भारतात बनलेल्या विमानांबद्दल बोलेल. ७ ऑक्टोबर २००१ पासून सलग सरकारप्रमुख म्हणून सेवा बजावत असलेल्या मोदींनी जनतेचे आभार मानले.