जयपूर
केरळच्या १९ वर्षीय केजिया लिझ मेजो (Kejiah Liz Mejo) हिने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२६' च्या किताबावर आपले नाव कोरले आहे. जयपूरमध्ये आयोजित एका नेत्रदीपक आणि शानदार सोहळ्यात तिला हा मानाचा मुकुट प्रदान करण्यात आला. या विजयानंतर आता ती आगामी नोव्हेंबर महिन्यात पोर्तो रिको येथे होणाऱ्या ७५ व्या 'मिस युनिव्हर्स' जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या स्पर्धेची अंतिम फेरी २३ ऑगस्ट रोजी पार पडली, ज्यामध्ये देशभरातून आलेल्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. कायद्याचे शिक्षण घेणारी आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असलेली केजिया लिझ मेजो ही प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. या स्पर्धेत तामिळनाडूची वैष्णवी गणेश ही पहिली उपविजेती (First Runner-up), तर गुजरातची अनुश्री सातवलेकर ही दुसरी उपविजेती (Second Runner-up) ठरली. विविध फेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपले व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीची जाण यांचे सादरीकरण केले.
हा किताब पटकावल्यानंतर आनंद व्यक्त करताना केजिया लिझ मेजो म्हणाली, "हा मानाचा किताब केवळ एक यश नसून ही एक मोठी जबाबदारी आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. या संधीच्या माध्यमातून भारतातील विविधता, संस्कृती, कला आणि नवीन पिढीची ताकद संपूर्ण जगासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न असेल."
मिस युनिव्हर्स इंडियाचे प्रमुख निखिल आनंद यांनी देशातील तरुण महिलांना त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरत असल्याचे सांगत जयपूर प्रशासनाचे आभार मानले.