नवी दिल्ली
देशातील विमान प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व व्यावसायिक वैमानिकांची (कमर्शियल पायलट्स) वर्षभर रँडम पद्धतीने सायकोएक्टिव्ह सबस्टन्स टेस्ट (ड्रग टेस्ट) घेण्याच्या पर्यायावर नागरी विमान वाहतूक मंत्रालय विचार करत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पायलट्सच्या ड्रग-टेस्टिंगचे निकष अधिक कडक करण्यासाठी 'डिरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन' (DGCA) विविध भागधारकांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या नियमांनुसार संपूर्ण पायलट नेटवर्कच्या १० टक्के लोकांची रँडम ड्रग टेस्ट घेतली जाते. मात्र, यामध्ये बदल करून वर्षभरात कधीही कोणत्याही पायलची रँडम डॉप टेस्ट घेण्याचा नियम लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. यावर सर्व भागधारक कसा प्रतिसाद देतात, हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. पुकेट-दिल्ली विमानातील एका घटनेत एअर इंडियाचा कॅप्टन ड्रग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पायलट्सच्या डॉप टेस्टचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनेही त्यांच्या सर्व पायलट्सची अनिवार्य सायकोएक्टिव्ह चाचणी सुरू केली आहे.