मुंबईतील बिलाल ईदगाह मैदानात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मोफत आरोग्य शिबिरात उपस्थित मान्यवर
भक्ती चाळक
जगातील प्रत्येक माणसाला आनंद अन् आरोग्य मिळवून देणे हीच संदेष्टा हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची खरी शिकवण आहे, हा विचार मनात ठेवून मुंबईतील मौलाना शौकत अली रोड येथील प्रसिद्ध सुन्नी मस्जिद बिलाल ईदगाह मैदानात एक आगळावेगळा उपक्रम पार पडला. ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधत लहान मुले आणि महिलांसाठी मोफत भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
इस्लाम धर्मात खिदमत-ए-खल्क म्हणजेच मानवतेच्या सेवेला अत्यंत पवित्र आणि उच्च स्थान दिले गेले आहे. याच परंपरेचा प्रत्यय रविवारी या मैदानात पाहायला मिळाला. परिसरातील शेकडो गरजू रुग्णांवर निष्णात डॉक्टरांच्या टीमने काळजीपूर्वक मोफत उपचार केले.
या वैद्यकीय शिबिराच्या पाठीशी ज्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन होते, ते धर्मगुरू मौलाना सय्यद मोईन उद्दीन अश्रफ यांनी मानवतेच्या सेवेचे महत्त्व विशद केले. मौलाना सय्यद मोईन उद्दीन अश्रफ म्हणाले, "माणसांची सेवा करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पैगंबर साहेबांनी नेहमीच प्रत्येक मानवाला सुख-आरोग्य कसे लाभेल याचा विचार केला. 'तुमच्यापैकी सर्वात उत्तम माणूस तोच आहे, जो इतरांच्या कामाला येतो आणि त्यांना फायदा पोहोचवतो,' हा पैगंबर साहेबांचा संदेश आहे. याच विचारांवर चालत ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभप्रसंगी गरीब अन् गरजू रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी हा छोटासा प्रयत्न केला गेला."
महिलांच्या मोठ्या उपस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, "मानवतेची सेवा ही ईश्वराची कृपा मिळवण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. ईश्वराने माणसाला फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बनवले नसून, इतरांच्या मदतीला धावून जाण्यासाठी निर्माण केले आहे. एकमेकांना मदत केल्याने समाजात आपुलकी, बंधुभाव आणि प्रेम वाढते. जेव्हा एखादी व्यक्ती गरीब, आजारी, अनाथ किंवा अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा करत असते."
कुराणमधील शिकवणीचा दाखला देत मौलाना सय्यद मोईन उद्दीन अश्रफ यांनी स्पष्ट केले की, सेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे. एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी पाजणे, आजारी माणसाची विचारपूस करणे, त्याच्या उपचाराची सोय करणे, अनाथाच्या डोक्यावर प्रेमाचा हात फिरवणे अन् कोणाचीही अडचण दूर करणे... हे सर्व मानवी सेवेचेच वेगवेगळे मार्ग आहेत. आज समाजात अनेक लोक आपल्या मदतीची वाट पाहत आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केला पाहिजे आणि आपल्या मुलांवरही सेवेचे संस्कार रुजवले पाहिजेत.
तज्ज्ञ डॉक्टरांची फौज अन् शेकडो रुग्णांना लाभ
सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात छोटा सोनापूर परिसर आणि आसपासच्या भागातील महिला, लहान मुले अन् पालकांनी मोठी गर्दी केली होती. अवघ्या तीन तासांच्या कालावधीत २०० हून अधिक रुग्णांनी या संधीचा लाभ घेतला.
या शिबिरात नामांकित डॉक्टरांची टीम तैनात होती. यामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहत्सिम सोळकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. झरीन झोहरा, जनरल फिजिशियन डॉ. आरफीन, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मदिहा मेमन, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनम सय्यद, जनरल फिजिशियन डॉ. सुनीता आणि अस्थिरोगतज्ज्ञ (ऑर्थोपेडिक) डॉ. अली असगर यांनी अहोरात्र सेवा दिली. महिला आणि लहान मुलांवर विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
दर सहा महिन्यांनी होणार भव्य शिबिर - आमदार अमीन पटेल
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापनात स्थानिक आमदार अमीन पटेल आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतः शिबिराला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
आमदार अमीन पटेल म्हणाले की, "हजरत मोईन अश्रफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन दिवसांत मौलाना शौकत अली रोडवर महिला व मुलांसाठी हे उत्तम आरोग्य शिबिर उभे राहिले. डॉ. मोहत्सिम सोळकर, डॉ. मदिहा मेमन यांच्यासह महापालिकेच्या नामांकित डॉक्टरांनी इथे मोलाची सेवा दिली आहे."
पुढे बोलताना अमीन पटेल म्हणाले की, "नगरसेवक जावेद जुनेजा, नझिमा जुनेजा, सूफी साहेब, इम्रान गुजराती, सय्यद फुरकान, ॲड. याकूब, असलम लाखा आणि सर्व महिला कार्यकर्त्यांनी या शिबिरासाठी अफाट मेहनत घेतली आहे. हजरत साहेबांच्या सूचनेनुसार, आता दर सहा महिन्यांनी ईदगाह मैदानात अशाच भव्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले जाईल, जेणेकरून परिसरातील महिला, नागरिक आणि लहान मुलांना त्याचा सतत लाभ मिळत राहील."
याप्रसंगी असलम लाखा, युसूफ पंजाबी, मोहम्मद ताज कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक सणांच्या निमित्ताने अशा प्रकारे थेट आरोग्य सेवा पुरवून समाजाला नवा संदेश दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. हा उपक्रम शहरात एका नव्या सामाजिक सलोख्याचा आणि सेवेचा संदेश देणारा ठरला आहे.