राष्ट्रीय एकता कॉन्फरन्समधून जमीयत उलेमाने दिला एकतेचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
पुण्यातील कोंढवा पारगे लॉन्स येथे जमीयत उलेमा आयोजित राष्ट्रीय एकता कॉन्फरन्स
पुण्यातील कोंढवा पारगे लॉन्स येथे जमीयत उलेमा आयोजित राष्ट्रीय एकता कॉन्फरन्स

 

अल्फिया शेख

समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि सर्वधर्मीयांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने कोंढव्यातील पारगे लॉन्स येथे 'राष्ट्रीय एकता कॉन्फरन्स' उत्साहात पार पडली.

जमीयत उलेमा पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हिंदू, मुस्लिम, शिख आणि ख्रिश्चन अशा सर्वच धर्मांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. जमीयत उलेमा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कारी मोहम्मद इद्रिस अंसारी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविधतेतील एकता हीच आपल्या देशाची खरी ओळख अन् ताकद असल्याचे सांगत वक्त्यांनी एकत्र राहण्याचा संदेश उपस्थितांना दिला.
 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि जमीयत उलेमा जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती मुहम्मद हारून नदवी यांनी आपल्या भाषणात समाज जोडण्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला. ते म्हणाले की, "एकमेकांमधील भेदभाव विसरून प्रेमाने आणि बंधुभावाने राहणे हीच आपल्या संस्कृतीची सर्वात मोठी संपत्ती आहे. हिंदू-मुस्लिम एकता हीच या देशाची मूळ ताकद असून ती मजबूत ठेवणे सर्वांचे कर्तव्य आहे."

या कॉन्फरन्सच्या माध्यमातून केवळ धार्मिक एकतेचाच नव्हे, तर नशामुक्तीचाही एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेपासून दूर राहावी आणि त्यांनी समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या व्यासपीठावरून करण्यात आले.

सामाजिक ऐक्याचे आवाहन
पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधत सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. प्रशांत जगताप म्हणाले की, "सध्या देशात धर्मांध शक्ती सत्ता गाजवत असल्या, तरीही आपण आपली आपुलकी आणि एकजूट अजिबात तुटू देता कामा नये. ऐक्य कायम टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे."

अहद फाऊंडेशनचे संस्थापक अझहर मणियार यांनीही या परिषदेला उपस्थित राहून विचार मांडले. अझहर मणियार म्हणाले की, "देशातील शांतता, सलोखा आणि बंधुभाव अधिक मजबूत करण्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होणे आणि मान्यवरांचे विचार ऐकणे ही एक मोलाची संधी होती."
 

पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रशासकीय अन् पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुणे आणि कोंढव्यातील शांततेच्या परंपरेचा गौरव केला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "राष्ट्रीय एकता कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व धर्म आणि समाजातील लोक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. याबद्दल मी आयोजक कारी मोहम्मद इद्रीस अंसारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. कोंढवा परिसरात अन् संपूर्ण पुण्यात नेहमीच राष्ट्रीय एकता आणि अखंडता टिकून राहिली आहे. इथे कधीही कायदा-सुव्यवस्थेचा किंवा जातीय ताणतणावाचा प्रश्न निर्माण झालेला नाही. लहान-मोठ्या घटना घडल्या तरी आपण सर्वजण एकत्र येऊन त्यावर मार्ग काढतो आणि पुढेही हीच स्थिती राहील."

पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, "मोठ्या उत्साहाने एकत्र आलेल्या नागरिकांना मी हेच आश्वस्त करतो की पोलीस दल नेहमीच तुमच्यासोबत आहे. सर्व समाजातील लोक जेव्हा राष्ट्रीय एकतेसाठी असे एकत्र येतात, तेव्हा त्याचा नक्कीच शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेवर सकारात्मक अन् खूप चांगला परिणाम होतो."

या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त परिमंडळ राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग रामदास इंगवले, नगरसेवक ॲड. हाजी गफूर पठाण यांच्यासह विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 

शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रीय एकता परिषदेला परिसरातील ६०० ते ७०० नागरिकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन कोंढवा पोलीस ठाण्याच्या वतीने पारगे लॉन्स परिसर आणि आसपासच्या भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण परिषद अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter